गांजा विक्री करणाऱ्या टोळीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:25 AM2021-03-17T04:25:12+5:302021-03-17T04:25:12+5:30
इचलकरंजी : यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहत परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या चौघांच्या टोळीला पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने अटक ...
इचलकरंजी : यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहत परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या चौघांच्या टोळीला पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून पाच किलो गांजा, चार मोबाईल, एक कार असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत या टोळीकडून गांजाचा पुरवठा होत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
शाहरूख सादिक गवंडी (वय २४), वसिम अब्दुलसत्तार बाणदार (२८), अझमेर इकबाल मुल्ला (२३) व महंमद एहसान हारीस (२०, सर्व रा. तासगाव, जि. सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हे चौघेजण गांजा विक्रीसाठी यड्राव परिसरात येणार असल्याची माहिती उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकाला समजली. त्यानुसार सोमवारी (दि. १५) रात्री सापळा रचून पाळत ठेवण्यात आली होती. त्यावेळी संशयास्पद कार औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोर थांबली. त्यावेळी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता ६७ हजार ५०० रुपयांचा पाच किलो गांजा सापडला. त्यांच्याकडून गांजासह कार व चार मोबाईल जप्त केले. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात गांजा सापडत आहे. त्यांना याच टोळीकडून पुरवठा होत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
चौकट
पान शॉप मालकावर गुन्हा दाखल
राजर्षी शाहू पुतळा परिसरातील नगरपालिकेच्या शाळेत गांजा ओढताना ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाकडे चौकशी केली असता शाहू पुतळा येथील गझल पान शॉपमधून हुक्क्याचे साहित्य खरेदी केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पान शॉपचा मालक शंकर विष्णू ठाणेकर (५९, रा. भोनेमाळ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फोटो ओळी
१६०३२०२१-आयसीएच-०४
गांजा विक्रीसाठी आलेल्या चौघांच्या टोळीला पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने अटक केली.
१६०३२०२१-आयसीएच-०५
जप्त केलेली कार.
सर्व छाया - उत्तम पाटील