Kolhapur: दहावीच्या विद्यार्थ्यांची गुणपत्रके रोखली, संस्थाचालकांच्या वादात विद्यार्थी अडचणीत; चंदगड तालुक्यातील प्रकार
By समीर देशपांडे | Published: June 19, 2023 12:10 PM2023-06-19T12:10:11+5:302023-06-19T12:10:30+5:30
शैक्षणिक प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ही गुणपत्रके अत्यावश्यक असताना ती न देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल
समीर देशपांडे
कोल्हापूर : दहावीचा निकाल लागून सोळा दिवस झाले तरी चंदगड तालुक्यातील दाटे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांची दहावीची गुणपत्रके अद्यापही देण्यात आलेली नाहीत. डिप्लोमासह अन्य शैक्षणिक प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी ही गुणपत्रके अत्यावश्यक असताना ती न देण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालक हवालदिल झाले आहेत.
शारदा शिक्षण प्रसारक मंडळ यशवंतनगर या शिक्षण संस्थेची चंदगड तालुक्यात सात माध्यमिक शाळा, दोन कनिष्ठ महाविद्यालये आणि एक वरिष्ठ महाविद्यालय आहे. यातील दाटे येथील माध्यमिक विद्यालयातून यंदा दहावी परीक्षेला १५ विद्यार्थी बसले होते. त्यांचा ऑनलाइन निकाल २ जून रोजी त्यांना समजला आहे. मात्र, त्यानंतर अतिशय गरजेची असलेली गुणपत्रके त्यांना मिळालेली नाहीत. शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. पाटील आणि माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांच्यातील वादात एस.एस.सी. बोर्डाने ही गुणपत्रके दिलेली नसल्याचे सांगण्यात आले.
याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी विभागीय सचिव डी. एस. पोवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्या संस्थांमध्ये वाद आहेत अशा संस्थांची यादी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून आम्हाला दरवर्षी प्राप्त होते. यातील कोणाला अधिकृतपणे गुणपत्रिका द्यावयाच्या आहेत याची माहिती माध्यमिक विभागाकडून आल्यानंतर खात्री करूनच आम्ही या गुणपत्रिका देतो. परंतु, या शाळेकडून अधिकृतपणे कोणीही आले नसल्यामुळे या गुणपत्रिका दिलेल्या नाहीत. माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आज, सोमवारी या विषयाची माहिती घेऊन त्यातून मार्ग काढणार असल्याचे सांगितले.
मुलांच्या भवितव्याशी खेळ कशासाठी?
शिक्षण संस्थाचालकांचा वाद जरी असला तरी तो मुलांच्या भवितव्याशी खेळणारा नसावा. या शिक्षण संस्थेच्या अन्य माध्यमिक विद्यालयांच्या गुणपत्रिका मिळालेल्या असताना याच विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका न मिळण्यात नेमका कोणी खोडा घातला, अशी विचारणा होत आहे.
आमचा आणि विरोधकांचा शिक्षण संस्थेत वाद आहे. परंतु, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होता कामा नये. सोमवारी कोल्हापूरमध्ये येऊन हा विषय संपवणार आहे. - जे. बी.पाटील, सचिव, शारदा शिक्षण प्रसारक मंडळ, यशवंतनगर
शिक्षण संस्थेत आमचा काहीही वाद असला तरी दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका देण्यापासून कोणीच कोणाला रोखलेले नाही. या गुणपत्रिका तातडीने मिळाव्यात. - भरमूआण्णा पाटील, माजी राज्यमंत्री