बाजार समिती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाजीपाला उधळला
By admin | Published: June 5, 2017 05:02 PM2017-06-05T17:02:19+5:302017-06-05T17:02:19+5:30
शिल्लक माल विक्री रोखली : समितीत तणाव
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. 0५ : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत सोमवारी शिल्लक माल विक्री करताना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना तो रोखला. टोमॅटो, बटाट्यासह इतर भाजीपाला अक्षरश: उधळून लावल्याने समिती परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बाजार समिती प्रशासनाने शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठींबा देण्यासाठी सोमवारी सौदे बंद ठेवले होते. पण रविवारी शिल्लक राहिलेला मालाची विक्री सोमवारी सकाळी सुरू होती. त्यावेळी युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांच्यांसह इतर कार्यकर्त्यांनी ती रोखली. ‘बंद म्हणजे बंद’, ‘शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे’ अशा जोरदार घोषणाबाजी करत अॅड. शिंदे यांनी विक्रीसाठी ठेवलेला टोमॅटो, लिंबू, बटाटा उधळून लावला. शिंदे यांनी अचानकपणे उचलाउचली सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला.
व्यापाऱ्यांसह बाजार समिती कर्मचाऱ्यांनाही काही वेळ सुचेना,अखेर व्यापाऱ्यांनी शिंदे यांना थांबवून समजावण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचा रविवारी शिल्लक राहिलेला मालाची विक्री करत आहे, सोमवारी माल आलेलाच नाही. अडते-व्यापाऱ्यांचा शेतकरी संपास पाठींबा आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन माल विक्री बंद करा अन्यथा उधळून लावू, असा इशारा दिला. अखेर पोलीसांनी हस्तक्षेप करून शिंदे यांना समिती आवारातून बाहेर काढले.
त्यानंतर आदम मुजावर, मकरंद कुलकर्णी आदी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मिनी मार्केट मधील भाजीपाला विक्री रोखली. तेथील माल उधळून लावल्याने पुन्हा गोंधळ उडाला.
व्यापारी व शिंदे यांच्यात बाचाबाची!
अॅड. शिंदे यांनी शेतीमाला विस्कटण्यास सुरूवात केल्यानंतर व्यापाऱ्यांनी गोंधळ करण्यास सुरूवात केली. यावेळी व्यापारी व शिंदे यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.
आंदोलन सरकारच्या दारात करा
शेतकऱ्यांच्या जीवावरच आम्ही आहे. त्यांना चार पैसे जादा मिळाले पाहिजेत, यासाठी आमचाही प्रयत्न असतो. पण शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या मालाची नासधूस करून काय मिळवत आहेत. त्यांनी सरकारच्या दारात जाऊन आंदोलन करावे. अशी भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
शेतकरी संपाला आमचा पाठींबा आहे, रविवारचा शिल्लक माल विक्री करण्याची जबाबदारी आमची होती. पण माणिक शिंदे अचानकपणे येऊन शेतीमालाची नासधूस करू लागले हे योग्य नाही.
-जमीर बागवान, अध्यक्ष,
महालक्ष्मी भाजीपाला असोसिएशन