बाजार समिती :असुविधांबाबत माथाडी कामगार आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:44 AM2019-03-19T11:44:00+5:302019-03-19T11:45:59+5:30
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये सुविधा द्या, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा माथाडी कामगार युनियनच्या वतीने सोमवारी समिती प्रशासनाला दिले. कांदा-बटाटा मार्केटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोईसह इतर सुविधा तातडीने देण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये सुविधा द्या, या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हा माथाडी कामगार युनियनच्या वतीने सोमवारी समिती प्रशासनाला दिले. कांदा-बटाटा मार्केटमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोईसह इतर सुविधा तातडीने देण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
कांदा-बटाटा मार्केटमध्ये गेले अनेक दिवस पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. त्याचबरोबर शौचालय, बाथरूमही नसल्याने येथे येणाऱ्या शेतकऱ्यांबरोबरच हमाल, तोलाईदारांची गैरसोय होते. याबाबत माथाडी संघटनेने अनेकवेळा समिती प्रशासन व अडत्यांकडे मागणी केली होती; पण त्याकडे दुर्लक्ष केले होते.
सोमवारी माथाडी कामगारांनी मागण्यांचे निवेदन समितीचे सभापती बाबासो लाड व सचिव मोहन सालपे यांना दिले. यावेळी समितीचे संचालक परशुराम खुडे, माथाडी कामगार संघटनेचे नेते बाबूराव खोत, आकाराम केसरे, दीपक पाटील यांच्यासह माथाडी कामगार उपस्थित होते.
आठ दिवसांत पिण्याच्या पाण्याची सोय
कांदा-बटाटा मार्केटमध्ये समितीच्या वतीने आठ दिवसांत पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली जाईल. येथे विंधनविहीरीच्या माध्यमातून पाणी देण्याचे आश्वासन सभापती लाड यांनी दिले.
तर १ एप्रिलपासून कामबंद !
वास्तविक स्वच्छतागृहाची सोय माथाडी कामगारांच्या संबंधित अडत दुकानदारांनी करायची आहे; पण त्यांच्याकडे मागणी करूनही ते दखल घेत नसल्याने माथाडी कामगार आक्रमक झाले आहेत. अडत दुकानदारांनी स्वच्छता गृहाची सुविधा दिली नाही, तर १ एप्रिलपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा माथाडी कामगार संघटनेने दिला.