बाजार समितीही ‘स्मार्ट’ होणार
By admin | Published: November 16, 2015 12:19 AM2015-11-16T00:19:42+5:302015-11-16T00:29:09+5:30
पणन मंडळाकडे ४० कोटींचा प्रस्ताव : कोल्हापूर विभागातून संधी शक्य
कोल्हापूर : राज्यातील बाजार समित्या सक्षम करण्यासाठी राज्य कृषी पणन मंडळाने एक-एक पाऊल टाकण्यास सुरुवात केली असून, समित्यांच्या पायाभूत सुविधांसाठी खास निधी देण्यात येणार आहे. ‘स्मार्ट’ शहराच्या धर्तीवर स्मार्ट बाजार समित्या करण्याची पणन मंडळाची संकल्पना असून, यामध्ये कोल्हापूर विभागातून कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची निवड होण्याची दाट शक्यता आहे. याबाबत ‘पणन’ने प्रस्ताव मागविला असून, ४० कोटींचा प्रस्ताव समितीने सादर केला आहे.
बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री व त्यातून मिळणारा सेस एवढेच त्यांचे उत्पन्न आहे. अनेक बाजार समित्यांचे उत्पन्न कमी असल्याने कर्मचाऱ्यांचे पगार भागविणे अवघड झाले आहे. पगारावरच खर्च होत असल्याने समितीमधील पायाभूत सुविधांची वानवा झालेली दिसते. रस्ते, गटारी यांचा तर बोजवारा उडालेला दिसतो. यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने बाजार समितींना ‘स्मार्ट’ करण्याचे धोरण पणन मंडळाने हाती घेतले आहे. प्रत्येक विभागातून दोन अशा १८ समित्या पहिल्या टप्प्यात स्मार्ट केल्या जाणार आहेत. कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील बाजार समित्यांचा समावेश होतो. ‘पणन’ मंडळाने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीकडून मे मध्येच प्रस्ताव मागविला आहे. समितीने ४० कोटींचा प्रस्ताव सादर केला असून यामधून कागल येथील मोकळ्या जागेत गोडावून, मार्केट यार्ड येथील मुख्य कार्यालय आवार व विविध मार्केटमधील रस्ते, गटारींसह पायाभूत सुविधा यामध्ये सुचविल्या आहेत.
पणन मंडळाचे धोरण पाहिले तर कोल्हापूर बाजार समितीची ‘स्मार्ट’ मध्ये निवड निश्चित मानली जाते. पणनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या जिल्ह्यातील बाजार समिती असल्याने कोल्हापूरचा समावेश होण्यात कोणतीही अडचण वाटत नाही. त्यात जिल्ह्यातून केवळ कोल्हापूर बाजार समितीचाच प्रस्ताव ‘पणन’कडे गेल्याने निवड निश्चित मानली जाते.