बाजार समितीच्या१२ हरकती फेटाळल्या
By admin | Published: May 3, 2015 12:55 AM2015-05-03T00:55:19+5:302015-05-03T00:55:19+5:30
मंगळवारी अंतिम यादी : ७९ हरकती दाखल होत्या
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतींपैकी १२ हरकती जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावल्या. निवडणूक अधिसूचना नसताना संचालक मंडळात बदल करण्याबाबत या हरकती होत्या. विविध गटांतील ६७ हरकती स्वीकारण्यात आल्या.
बाजार समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रारूप मतदार यादीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हरकती मागवल्या होत्या, यावर विकास सेवा संस्था, अडते-हमाली, ग्रामपंचायत, प्रक्रिया संस्था गटातून ७९ हरकती दाखल झाल्या होत्या. सर्वाधिक हरकती विकास सेवा संस्था गटात आल्या होत्या.
संस्थेची निवडणूक झाल्याने संचालक मंडळाच्या नावात बदल करावा, मृत-राजीनामा दिलेल्या संचालकांच्या ठिकाणी नावात बदल करावा, अशी मागणी केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन शनिवारी निकाल जाहीर केला. करवीर तालुक्यातील सोळा हरकतींपैकी सर्वच्या सर्व स्वीकारण्यात आल्या. पन्हाळा तालुक्यातील १३ मंजूर, तर ४ फेटाळल्या, राधानगरीत दोन स्वीकारल्या, तर दोन फेटाळल्या. कृषी प्रक्रिया संस्था गटात दहा मंजूर, तर चार फेटाळण्यात आल्या. ग्रामपंचायत व अडते-व्यापारी गटातील सर्व हरकती स्वीकारण्यात आल्या. (प्रतिनिधी)