पट्टणकोडोलीत सजला घोंगड्यांचा बाजार

By admin | Published: October 26, 2016 12:00 AM2016-10-26T00:00:44+5:302016-10-26T00:09:33+5:30

लाखो रुपयांची उलाढाल : राज्यभरातून मागणी; श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेचे खास आकर्षण; घोंगड्याला रेवड भरण्यासाठीही गर्दी

The market of decorated dolls in the plateau | पट्टणकोडोलीत सजला घोंगड्यांचा बाजार

पट्टणकोडोलीत सजला घोंगड्यांचा बाजार

Next

इरफान मुजावर- पट्टणकोडोली --महाराष्ट्रात सर्वांत मोठा भरला जाणारा घोंगडी बाजार पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेत बहरला आहे. यात्रेचे खास आकर्षण असणाऱ्या या घोंगडी बाजारात देवाची सावली मिळावी, या श्रद्धेने आणि थंडीमध्ये उबदार पांघरूण म्हणून घोंगडी खरेदी करण्यासाठी यात्रेकरूंची झुंबड उडाली आहे. घोंगड्याला रेवड भरण्यासाठीही बाजारात गर्दी आहे.
या बाजारामध्ये घोंगड्यांची किंमत अगदी पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत आहे. यात्रा काळात या घोंगडी विक्री बाजारातून लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.
पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेत मोठ्या घोंगडी विक्री बाजार भरतो. संकेश्वर, कागल, वडगाव, कापशी व मुरगूडचे घोंगडी व्यापारी येथे मोठ्या प्रमाणात येतात. ऊबदारपणाबरोबरच धार्मिक कारणही घोंगड्याला आहे. देवाच्या खांद्यावर असणाऱ्या कांबळ्यामुळे या घोंगड्याला धनगर बांधवांमध्ये एक विशिष्ट महत्त्वही प्राप्त झाले आहे. त्यामुळे या बाजारातून धनगर बांधव व यात्रेकरू आवर्जून घोंगडे खरेदी करतात. त्यामुळे हा बाजार येथील यात्रेतील आकर्षणाचा विषय बनला आहे.
श्री विठ्ठल बिरदेव यात्रेच्या पहिल्या दिवसापासून घोंगडी विक्रीचा बाजार सुरू होतो. हा बाजार दीपावलीपर्यंत चालू असतो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा राज्यातील भाविक यात्रेसाठी येतात आणि देवाच्या श्रद्धेपोटी या घोंगडी बाजारातून घोंगडी खरेदी करतात.
१५ ते २० मोठी दुकाने आणि काही स्टॉल या बाजारात घोंगडी विक्री करण्यासाठी घातली जातात.
पट्टणकोडोली येथील यात्रा आटोपल्यानंतर घोंगडी विक्रेते पुढील बाजारासाठी जातात. पंढरपूर, चिंचणी, हुलजंती (सोलापूर), कर्नाटकातील आरेकरी या गावांमध्येही घोंगडी बाजार भरतो. मात्र, श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेत घोंगडी मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने पट्टणकोडोली येथील घोंगडी बाजार महाराष्ट्रातील सर्वांत मोठा बाजार आहे.


गावाच्या नावावरून ओळख
१ घोंगडी बाजारामध्ये कोकरनूर, तुंग, संकेश्वरी, कुंदरगी, बुद्याळ, चळकेरी, मडेलरी, वाणके, नातपोत, जमखंडी, अथणी, मुरगुंडी, आदी घोंगड्यांचे प्रकार उपलब्ध असतात. घोंगड्यांना गावांच्या नावावरूनच ओळखले जाते.
२ काळ्या व पांढऱ्या घोंगड्यांवर आकर्षक रंगीत सुबक नक्षीकाम केलेले असते. या घोंगड्यांची किंमत ५०० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत आहे.
३ यामध्ये आॅस्ट्रेलियन मेरिना वुलन या प्रकारचे घोंगडे सर्वांत महागडे आहे. बाळलोकरी पासून बनविलेलं देवाचं कांबळही चार हजार रुपयांपर्यंत आहे.
४ लोकरीच्या घोटणीपासून बनविलेले जान याची सहाशे ते आठशे रुपयांपर्यंत विक्री होत आहे. त्याचशिवाय घोंगड्याला रेवड भरण्याचा पूरक व्यवसायही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो.


पट्टणकोडोली येथील घोंगडी बाजारात गेल्या २० वर्षांपासून घोंगडी विक्री दुकान लावतो. यात्रा काळात दरवर्षी मी लाखो रुपयांची घोंगडी विकतो. यात्रेकरू न चुकता एकतरी घोंगडे या बाजारातून घेऊन जातात. हा बाजार महाराष्ट्रातील सर्वांत मोठा बाजार आहे.
- आप्पा शिंगू शेळके,
घोंगडी विक्रेते, कागल

देवाच्या पूजेसाठी आणि धार्मिक कामासाठी आमच्या समाजात घोंगड्याला फार महत्त्व आहे. तसेच घोंगड्यावर झोपल्याने शरीराला फायदेशीर असते. त्यामुळे मी येथील यात्रेमधील घोंगडी बाजारातून दरवर्षी एक तरी घोंगडे, जान खरेदी करतोच.
- बिरू धनगर, ग्राहक,
पट्टणकोडोली

Web Title: The market of decorated dolls in the plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.