सणाआधीच खरेदीसाठी बाजारपेठेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:30 AM2021-08-17T04:30:00+5:302021-08-17T04:30:00+5:30

कोल्हापूर : चार महिन्यांनी हटविण्यात आलेले निर्बंध आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बाजारपेठेने आणि ग्राहकांनीही साहित्य, खरेदी-विक्रीचा पुनश्च हरिओम ...

The market is flooded with shoppers before the festival | सणाआधीच खरेदीसाठी बाजारपेठेला उधाण

सणाआधीच खरेदीसाठी बाजारपेठेला उधाण

googlenewsNext

कोल्हापूर : चार महिन्यांनी हटविण्यात आलेले निर्बंध आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बाजारपेठेने आणि ग्राहकांनीही साहित्य, खरेदी-विक्रीचा पुनश्च हरिओम केला. व्यवसायाची वेळ रात्री १० वाजेपर्यंत केल्याने कपडे, ज्वेलर्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, होम अप्लायन्सेस अशा प्रकारच्या दुकानांमध्ये तोबा गर्दी होती. दुसरीकडे घरचे आणि पार्सलचे खाऊन कंटाळलेल्या खवय्यांकडून हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत पदार्थांवर येथेच्छ ताव मारला जात आहे. यानिमित्ताने सणांच्या आधीच बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते. त्यातून लाखोंची उलाढाल सुरू झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे १३ एप्रिलपासून राज्याला पुन्हा लॉकडाऊन लागला. कोल्हापुरात मे, जूून, जुलै या तीन महिन्यांत कोरोनाचा कहर होता. त्यामुळे अन्य जिल्ह्यांत सगळे व्यवहार सुरू झाल्यावरही कोल्हापूरवरील निर्बंध हटत नव्हते. अखेर आता ऑगस्टमध्ये रुग्णसंख्या घटली आणि शासनाने स्वातंत्र्य दिनाची भेट देत सगळ्या व्यवहारांना रात्री १० वाजेपर्यंतची परवानगी दिली. हा आनंद साजरा करत रविवारीच बाजारपेठेत दाखल होत नागरिकांनी कित्येक दिवसांपासून राहून गेेलेल्या खरेदीचा आनंद लुटला.

सध्या श्रावण सुरू असून यापुढे सलग चार महिने सण असतात. त्यामुळे लहान-मोठ्यांचे कपडे, दागिन्यांची खरेदी, चपला, इमिटेशन ज्वेलरी, घर सजावटीचे साहित्य, भांड्यांची खरेदी, कौटुंबिक सोहळ्यांठीसा लागणारे साहित्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खरेदीसाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत.

----

हॉटेलमध्ये सरबराई

याआधी फक्त दुपारी चार वाजेपर्यंतच हॉटेलमध्ये जेवणाची परवानगी होती, पण दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीचे जेवण निवांतपणे करण्यासाठी लोक बाहेर पडतात. त्यामुळे अपेक्षित प्रतिसाद नव्हता. मात्र आता रात्री १० पर्यंत वेळ वाढविल्याने हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी होती. सगळ्याच हॉटेलबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे आचाऱ्यापासून वाढप्यापर्यंत, हॉटेलमधील सगळेच कर्मचारी ग्राहकांच्या सरबराईत गुंतले होते.

--

निवांत आणि मनसोक्त खरेदी...

आधी फक्त दुपारी चारपर्यंतची वेळ असल्याने नागरिकांना घाईघाईत तेवढ्याच वेळेत आणि मिळेल तसे सामान घ्यावे लागायचे. दुकानदारालाही माल असूनही एका ग्राहकावर जास्त वेळ घालवणे शक्य नसायचे. आता वेळ वाढविल्याने व्यावसायिक आणि ग्राहक दोघांनाही निवांत आणि मनसोक्तपणे यासाठी वेळ मिळत आहे. त्यामुळे महाद्वार रोड, राजारामपुरी, लुगडी ओळ, लक्ष्मीपुरी, मिरजकर तिकटी अशा प्रमुख बाजारपेठेत रस्त्यावर लोक मोकळेपणाने फिरत आहेत.

--

महापालिकेचा वॉच

सगळीकडे मास्कच्या नियमाचे बऱ्यापैकी पालन केले जाते, पण गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला आहे. तरीही प्रमुख बाजारपेठांमध्ये महापालिकेच्या वाहनातून फिरत कर्मचारी, नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत. हे वाहन आले की सगळे अलर्ट होतात, नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या.... सुरू होते.

----

वाहतूक कोंडी...

एवढे दिवस ४ वाजल्यानंतर सर्वत्र सामसूम व्हायचे, आता बाजारपेठ खुली केल्याने रस्त्यांवर पुन्हा वाहतूक कोंडी होत आहे. महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौक, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, बिंदू चौक, ताराबाई रोड, लुगडी ओळ येथे रस्त्यावरून चालणेही मुश्कील होत आहे.

---

दुपारी ४ पर्यंतची वेळ असताना खूप घाई आणि गर्दी व्हायची. माल असून ग्राहकांना दाखवता यायचा नाही. आता वेळ वाढविल्याने गर्दी कमी झाली आहे. ग्राहकांना चांगली सेवा देता येते. उलाढाल पूर्वपदावर यायला यामुळे मदत होईल.

- इम्रान कमते (कपडे व्यावसायिक)

--

पूर्वी वेळ कमी असल्याने खूप गडबड व्हायची. आता आरामात ग्राहकांना दागिने दाखवता येतात. निवडीला वाव राहतो. सध्या विवाहसोहळे सुरू आहेत शिवाय सण असल्याने दागिने खरेदीला चांगला प्रतिसाद आहे.

- राजेश राठोड (सराफ व्यावसायिक)

--

फोटो स्वतंत्र

---

Web Title: The market is flooded with shoppers before the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.