जीवाच्या जोखमीवर महामार्गावर बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:28 AM2021-08-24T04:28:08+5:302021-08-24T04:28:08+5:30
घनश्याम कुंभार यड्राव: धर्मनगर फाटा येथे कोल्हापूर-सांगली महामार्गावर भाजीपाल्यासह इतर मालाची विक्री होत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत ...
घनश्याम कुंभार
यड्राव: धर्मनगर फाटा येथे कोल्हापूर-सांगली महामार्गावर भाजीपाल्यासह इतर मालाची विक्री होत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे. या मार्गावर अवजड वाहतुकीसह चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ आहे. ग्राहक चार चाकी वाहने मार्गावरच उभी करत असल्याने रहदारीसाठी अडचणीचे ठरत आहे. ग्राहक व व्यापारी जीवाच्या जोखमीवर व्यवहार करत असून धर्मनगर फाटा धोकादायक बनत आहे. त्यांना सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
यड्राव, कोंडिग्रे, चिपरी, निमशिरगाव, येथील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी कोल्हापूर-सांगली महामार्गावरील धर्मनगर फाटा या ठिकाणी येतात. थेट शेतातून ताजा भाजीपाला मिळत असल्याने येथे ग्राहकांची गर्दी होत आहे. या ठिकाणी बेकरी उत्पादनासह विविध वस्तू विक्रीसाठी येत असल्याने बाजारच भरत आहे.
या ठिकाणी शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करण्यासाठी या मार्गावरून जाणारे चारचाकी वाहनधारक ग्राहक व्यापाऱ्यांपुढेच आपले वाहन लावून मालाची खरेदी करतात. तर कोल्हापूरकडे जाणारे वाहनधारक रस्त्याच्या डाव्या बाजूला वाहन थांबवून रस्ता ओलांडून खरेदीसाठी येतात. त्यामुळे या महामार्गावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्ता ओलांडताना ग्राहकांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोल्हापूर-सांगली महामार्गावर प्रवासी वाहतूक, अवजड वाहतूक यासह चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ आहे. येथून जाणारी वाहने भरधाव असतात. त्याचबरोबर मार्गावरच ग्राहकांची वाहने थांबत असल्याने हे ठिकाण धोकादायक बनले आहे. व्यापारी व ग्राहक जीवाच्या जोखमीवर व्यापार करत आहेत. त्यांना सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अन्यथा एखादा प्रसंग घडल्यावर प्रशासनास जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
फोटो - २३०८२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - कोंडिग्रे फाटा येथे कोल्हापूर-सांगली महामार्गावर जीवाच्या जोखमीवर अशाप्रकारे बाजार भरत आहे.