कोल्हापूरची प्लास्टिकमुक्तीकडे वाटचाल, रविवारच्या आठवडी बाजारात कापडी पिशवीतूनच बाजार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 06:32 PM2017-12-10T18:32:01+5:302017-12-10T18:32:23+5:30
‘पर्यावरणपूरक भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाकेला कोल्हापुरातील सामाजिक संस्थांनी साद देत प्लास्टिकमुक्तीकडे वाटचाल ठेवली आहे. ज्या ठिकाणी प्लास्टिकचा सर्रास वापर होतो, अशा आठवडी बाजारात रविवारी एका सामाजिक संस्थेने वीस हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले.
गणेश शिंदे
कोल्हापूर : ‘पर्यावरणपूरक भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाकेला कोल्हापुरातील सामाजिक संस्थांनी साद देत प्लास्टिकमुक्तीकडे वाटचाल ठेवली आहे. ज्या ठिकाणी प्लास्टिकचा सर्रास वापर होतो, अशा आठवडी बाजारात रविवारी एका सामाजिक संस्थेने वीस हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले. विशेष म्हणजे व्यापाºयांकडील प्लास्टिक पिशव्या घेऊन त्यांना कापडी पिशव्या दिल्या. पिशव्या मजबूत व किमान अडीच-तीन किलो साहित्य त्यांमध्ये सहज बसत असल्याने ग्राहकांनाही त्यांचे कुतूहल होते.
भारतात २९ राज्यांपैकी १७ राज्यांनी संपूर्ण प्लास्टिकबंदी केली आहे. याच धर्तीवर दहा दिवसांपूर्वी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही प्लास्टिकबंदी केली. त्यांनी संपूर्ण प्लास्टिकबंदीचा कायदा पुढील वर्षी गुढीपाडव्यापासून करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. प्लास्टिकबंदीची घोषणा स्वागतार्ह असली तरी यापूर्वी अनेक वेळा प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न झाले. लोकांनी प्लास्टिक वापरू नये, एवढेच प्रबोधन करण्यापेक्षा त्यांना कापडी पिशव्यांची सवय लावली तरच ही मोहीम यशस्वी होऊ शकते, या भूमिकेतूनच रविवारी लक्ष्मीपुरी आठवडा बाजारात एका स्वयंसेवी संस्थेने फळविक्रेते, भाजीविक्रेते यांच्याकडील प्लास्टिकची कॅरिबॅग घेऊन त्या बदल्यात लाल कापडी पिशव्या संपूर्ण बाजारात दिल्या. प्लास्टिकपेक्षा मजबूत व हाताळण्यास चांगल्या असल्याने ग्राहकांच्याही त्या पसंतीस पडत होत्या. यामुळे बाजारात आलेल्या ग्राहकांकडे लाल कापडी पिशव्या दिसत होत्या. स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांना अशा प्रकारे व्यापा-यांसह नागरिकांनी पाठबळ दिले तर कोल्हापूर प्लास्टिकमुक्त होण्यास वेळ लागणार नाही.
पुढील आठवड्यात येताना पिशव्या आणा-
स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांना व्यापारी वर्गाचे पाठबळ मिळत असल्याचे दिसते. कापडी पिशवी ग्राहकाला दिल्यानंतर पुढील आठवड्यात बाजाराला येताना ही पिशवीच घेऊन या, असे व्यापारी सांगत होते.
सध्या ५० मायक्रॉनच्या खाली असलेल्या प्लास्टिक पिशव्यांना (कॅरीबॅग) बंदी आहे. प्लास्टिकबंदीची घोषणा चांगली आहे.
-डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, कोल्हापूर महापालिका.
आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक मुक्तीसाठी गेली काही घटक २२ वर्षे जनजागृती करीत आहेत. ज्या संस्थेने या कापडी पिशवी वाटल्या, त्यांचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
- दीपक देवलापूरकर, अध्यक्ष, जनस्वास्थ्य दक्षता समिती, कोल्हापूर.
कॅरीबॅगमध्ये एक ते सव्वा किलोचा फळमाल बसत होता; पण या लाल कापडी पिशवीत सुमारे तीन किलो साहित्य बसते. या पिशव्या ग्राहकांना देतानाही आम्हालाही आनंद होतो आहे.
- गोविंद तलवार, फळविक्रेता, लक्ष्मीपुरी बाजार, कोल्हापूर