‘मद्रास’, ‘गुजरात’ हापूसची बाजारात धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:06 AM2018-05-07T01:06:41+5:302018-05-07T01:06:41+5:30
कोल्हापूर : ‘मद्रास’, ‘गुजरात’ हापूस आंब्यांची बाजारात सध्या ‘धूम’ पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘रत्नागिरी हापूस’ आंब्यांच्या दरात गत आठवड्यापेक्षा पेटीमागे ३०० रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात ‘रत्नागिरी हापूस’चा दर सरासरी २०० ते २५० रुपये डझन झाला आहे. पिवळ्या धमक आंब्यांनी फळांचे बाजार फुलले आहेत. त्यामुळे आंबे खरेदीत तेजी आली आहे.
प्रत्येक वर्षी मे महिन्यात आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते; पण यंदा खराब हवामानाचा फटका बसल्याने हापूस आंब्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोकणातूनच थेट मुंबईसह इतर बाजारपेठेत आंबा जाऊ लागल्याने कोल्हापूर बाजारात आंब्यांची आवक कमी झाली होती. मार्च, एप्रिलमध्ये ‘रत्नागिरी हापूस’ ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेला होता.
त्याचा दर ४००-५०० रुपये डझन राहिल्याने यंदा हापूसची चव चाखायला मिळणार का? याची धास्ती ग्राहकांना होती; पण मे महिन्यात बाजारात ‘मद्रास’ व ‘गुजरात’ हापूस आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत रोज ‘मद्रास हापूस’च्या १००० पेट्या, तर २००० बॉक्सची आवक होते. गत आठवड्याच्या तुलनेत आवक तिपटीने वाढली असून, ‘मद्रास’ पायरीची आवकही सुरू असल्याने सध्या बाजार पिवळ्याधमक आंब्यांनी बहरलेला दिसतो.
घाऊक बाजारात सध्या ‘मद्रास’ हापूस सरासरी ९०० रुपये पेटी, तर बॉक्सचा दर २२५ रुपये आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात ‘रत्नागिरी’, ‘देवगड’ हापूस आंब्याच्या पेटीचा दर सरासरी १८०० रुपये होता.
आता तोच दर १५०० रुपये, तर दोन डझनांचा बॉक्स ३०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. रायवळ आंब्याची आवक रोज ३००० पेक्षा अधिक बॉक्स होत आहे. त्यात ५० रुपयांपासून रायवळ आंब्यांचा बॉक्स मिळत आहे.
हापूस आंब्यांचा घाऊक बाजारात दरदाम असा
आंबा आवक सरासरी दर
हापूस १६४० पेटी १५०० रुपये (पेटी)
हापूस ८४७५ बॉक्स ३०० रुपये (बॉक्स)
रायवळ २९०० बॉक्स १०० रुपये (बॉक्स)
मद्रास हापूस ९१० पेटी ९०० रुपये (पेटी)
मद्रास हापूस १८५० बॉक्स २२५ रुपये (बॉक्स)
मद्रास पायरी ३०० पेटी ५०० रुपये (पेटी)
मद्रास पायरी १४७५ बॉक्स १५० रुपये (बॉक्स)
‘तोतापुरी’ची
आवक सुरू
साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याकडे तोतापुरी आंब्यांची आवक सुरू होते; पण यंदा ही आवक थोडीशी लवकर सुरू झाली असून, बाजार समितीत रोज दीड ते दोन टन आंबा येत आहे.