लघुपटांची बाजारपेठ चित्रपटांपेक्षा मोठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:24 AM2021-03-15T04:24:07+5:302021-03-15T04:24:07+5:30
कोल्हापूर : समाजावर अल्पावधीत मोठा परिणाम करण्याची ताकद लघुपटात असते. त्यामुळे लघुपटांची बाजारपेठ चित्रपटांपेक्षा मोठी आहे. याकडे नवीन संधी ...
कोल्हापूर : समाजावर अल्पावधीत मोठा परिणाम करण्याची ताकद लघुपटात असते. त्यामुळे लघुपटांची बाजारपेठ चित्रपटांपेक्षा मोठी आहे. याकडे नवीन संधी म्हणून पाहावे. त्यातील तंत्र समजून घ्यावे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले. रविवारी शाहू स्मारक भवनात झालेल्या पहिल्या चित्रतपस्वी भालजी पेंढारकर लघुपट महोत्सवाच्या बक्षीस समारंभात ते बोलत होते.
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर फिल्म सोसायटीतर्फे हा लघुपट महोत्सव आयोजित केला होता.
सोलापूरकर म्हणाले, भालजी पेंढारकरांनी इतिहास न बदलता शिवचरित्र बोलपटातून मांडले. त्यांचे चित्रपट आजही प्रेरणादायी व अभ्यासण्यासारखे आहेत. कमीत कमी वेळात समाजमनावर मोठा प्रभाव टाकण्याचे सामर्थ्य लघुपटात आहे. त्यामुळेच परदेशामध्ये लघुपटांना मोठे महत्त्व आहे. लघुपटांची बाजारपेठ चित्रपटांपेक्षा मोठी आहे. चांगला लघुपट बनविण्यासाठी आधी जगाचा सिनेमा पहायला शिका आणि त्यातील तंत्र समजावून घेतले तर तो लघुपट प्रेक्षकाच्या मनात उतरेल.
यावेळी गोकुळचे अध्यक्ष रवींद्र आपटे, संचालक बाबा देसाई, राहुल सोलापूरकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. राहुल सोलापूरकर यांची मुलाखत भरत दैनी यांनी घेतली.
चौकट
महोत्सवात ४२ लघुपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातील २७ प्रदर्शित करण्यात आल्या. मराठी, तामिळ, तेलुगू, हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषेतील लघुपटांचा समावेश होता. परीक्षक म्हणून विद्यासागर अध्यापक, महेश डिग्रजकर यांनी लघुपट निर्माण करणाऱ्या तरुणांशी संवाद साधला.
पुरस्कार विजेते
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म चित्रतपस्वी पुरस्कार - संगर
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म चित्रदर्शी पुरस्कार - पाऊस
सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म कलासक्त पुरस्कार - नकार
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - उमेश बोळके (संगर)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - सुनील चौगुले (संगर)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मंजूषा खेत्री (काजवा)
सर्वोत्कृष्ट पटकथा - विजय माळी (भाकड)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - अमोल घाडीगावकर (प्रॉन्स)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - केदार कुलकर्णी (चंद्रलेखा)
सर्वोत्कृष्ट संकलन - पुष्कर जळगावकर (प्रॉन्स)
फोटो : १४०३२०२१-कोल-शार्ट फिल्म
ओळी : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात चित्रतपस्वी भालजी पेंढारकर फिल्म सोसायटीतर्फे पहिल्या चित्रतपस्वी भालजी पेंढारकर लघुपट महोत्सवातील बक्षीस विजेत्यांसोबत डावीकडून बाबा देसाई, रवींद्र आपटे, सोलापूरकर, प्रमोद ढोले, विद्यासागर अध्यापक, महेश डिग्रजकर, भरत दैनी उपस्थित होते.