बंदी आदेश झुगारून लक्ष्मीपुरीत भरला बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 11:23 AM2020-06-22T11:23:05+5:302020-06-22T11:24:55+5:30
कितीही नियम केले तरी आम्ही मोडणारच, अशीच मानसिकता बनलेल्या लक्ष्मीपुरी भाजी मंडईत नियम मोडण्याचा सिलसिला रविवारीही कायम राहिला. बाजार बंद राहील असे आदेश काढूनही व्यापाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवत रस्त्यावरच बाजार मांडला. त्यामुळे नेहमीसारखी बाजारात रस्त्यावर गर्दी उसळली.
कोल्हापूर : कितीही नियम केले तरी आम्ही मोडणारच, अशीच मानसिकता बनलेल्या लक्ष्मीपुरी भाजी मंडईत नियम मोडण्याचा सिलसिला रविवारीही कायम राहिला. बाजार बंद राहील असे आदेश काढूनही व्यापाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला व्यापाऱ्यांनी केराची टोपली दाखवत रस्त्यावरच बाजार मांडला. त्यामुळे नेहमीसारखी बाजारात रस्त्यावर गर्दी उसळली.
लक्ष्मीपुरी परिसर अतिजोखीमग्रस्त म्हणून जाहीर केल्यानंतर बाजार भरवू नये अशी भूमिका महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी घेतली होती. प्रशासनाने व्यापाऱ्यांचे विकेंद्रीकरण करण्याचाही प्रयत्न केला; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. गर्दी वाढतच राहिली.
त्यामुळे शुक्रवारी आयुक्तांनी बंदी आदेश काढून आठवडा बाजार बंद राहणार असल्याचे जाहीर केले; पण प्रत्यक्षात रविवारी सकाळी तासभरच बाजार बंद राहिला. कारवाईला कोण येत नाही, म्हटल्यावर सर्वच व्यापाऱ्यांनी टेम्पोसह धाव घेतली. टेम्पोत बसूनच त्यांनी भाजी विक्री सुरू केली. फळविक्रीच्या गाड्या आधीपासून सुरूच होत्या. त्यात भाजीवालेही बसल्याने एकूणच रस्त्यांवर प्रचंड विस्कळीतपणा आला. मिळेत त्या जागेवर विक्री सुरू झाली. बाजार सुरू झाला आहे म्हटल्यावर ग्राहकांचीही गर्दी वाढू लागली. एकच्या सुमारास तर गर्दीने रस्ते ओसंडून वाहू लागले.
बंदी आदेश असतानाही भाजीपाला विक्री करताना व्यापाऱ्यांनाही धास्ती होतीच. विक्री सुरू असतानाच पोलिसांची गाडी येताना दिसल्यावर व्यापाऱ्यांनी ह्यगाडी आली, पळा पळाह्णह्ण अशी आरडाओरड सुरू केली. व्यापाऱ्यांची आवराआवर सुरू झाली; पण प्रत्यक्षात गाडी समोर आल्यानंतर पोलिसांनी मोबाईल, पर्स सांभाळा असे पुकारल्यानंतर तणावाची जागा हास्याने घेतली आणि त्यांनी बिनदिक्कतपणे विक्री सुरू केली.
कोथिंबीर १० रुपये पेंढी
मागील दोन-तीन महिने ऐट मिरवणारी कोथिंबीर आता मात्र कचरा झाली आहे. ५० रुपयांनी विकल्या गेलेल्या कोथिंबिरीचा दर १० रुपये झाला तरी गिऱ्हाईक नाही. बाजारात कोथिंबीरीचे ढीगच लागले आहेत. टेम्पोत बसून ओरडून ओरडून विकावे लागत आहे.
भाजीपाला मुबलक, दर ४० ते ५० रुपये किलो
बाजारात भाजीपाल्याची आवक मुबलक झाली आहे. वांगी, दोडका, गवारी, ढबू मिरची, कोबी, दुधीचे दर ४० ते ५० रुपये किलो असेच आहेत. फ्लॉवरची आवक जास्त दिसत असून एक गड्डा १० ते २० रुपयांना आहे. टोमॅटोही १५ ते २० रुपये किलो असा दर आहे. मेथीची आवक वाढत असून दरही आवाक्यात आले आहेत. १० ते १५ रुपये असा पेंढीचा दर आहे. लिंबूंची आवक वाढली असून पिवळेधमक लिंबू १० रुपयांना १० असे विकले जात आहेत.