आजऱ्याचा आठवडा बाजार भरलाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:57+5:302021-04-10T04:22:57+5:30
आजरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजऱ्याच्या शुक्रवारी भरणारा आठवडा बाजार बंद राहणार असल्याचे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी जाहीर ...
आजरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजऱ्याच्या शुक्रवारी भरणारा आठवडा बाजार बंद राहणार असल्याचे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे आज (शुक्रवारी) आजऱ्याचा बाजार भरलाच नाही. मात्र, गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर किराणा दुकानातून खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली होती.
आजऱ्याचा आठवडा बाजार बंद करावा, असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला होता. त्याला अनुसरून नगर पंचायतीने बाजारपेठेत स्पीकरवरून आठवडा बाजार बंद असल्याचे व नागरिकांनी बाजारात येऊ नये, असे आवाहन केले होते.
त्यामुळे शुक्रवारी किराणा, भाजीपाला व मेडिकल वगळता आजरा शहरातील सर्व दुकाने बंद होती. मात्र, किराणा दुकानात वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. काही दुकाने शटर उघडून सुरू होती. मात्र, नगर पंचायत व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच सर्वांनी दुकाने बंद ठेवली.
सकाळच्या सत्रात असणारी बाजारातील गर्दी दुपारनंतर कमी झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. बहुतांशी नागरिकांनी मास्क लावले होते. मात्र, किराणा दुकानातून खरेदी करताना सामाजिक अंतर न ठेवताच व मास्क काढून खरेदी केल्यामुळे अनेकांना दंड भरावा लागला.
शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत आजरा शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे.