‘मार्केट यार्ड’ नवख्या उमेदवारांतच रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:22 AM2021-02-07T04:22:17+5:302021-02-07T04:22:17+5:30

विनोद सावंत/ लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड (प्रभाग क्रमांक २०) प्रभाग अनुसूचित ...

‘Market Yard’ is a no-brainer for new candidates | ‘मार्केट यार्ड’ नवख्या उमेदवारांतच रस्सीखेच

‘मार्केट यार्ड’ नवख्या उमेदवारांतच रस्सीखेच

Next

विनोद सावंत/ लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड (प्रभाग क्रमांक २०) प्रभाग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने सात ते आठ मातब्बरांचे पत्ते कट झाले आहेत. येथे नवख्यांमध्ये सामना रंगणार असून, तीने ते चार इच्छुकांच्या नावांची चर्चा सुरू आहे. सध्या गाठीभेटी, हळदी-कुंकूच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये लॉटरी कोणाला लागणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

शहरातील इतर प्रभागाच्या तुलनेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत मोठा प्रभाग असणारा राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड (प्रभाग क्रमांक २०) हा प्रभाग आहे. लोकसंख्या कमी आणि क्षेत्र जास्त अशी येथील स्थिती आहे. शहरातील पूर्वेकडील प्रवेशद्वार म्हणजेच तावडे हॉटेल चौक, बापट कॅम्प ते महाडिक वसाहत असा परिसर आहे. झोपडपट्टी, मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू अशी संमिश्र वस्ती येथे आहे. कुंभार समाजातील नागरिकांची संख्या जास्त आहे.

महापालिकेच्या गत निवडणुकीत हा प्रभाग सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित होता. यावेळी अनेकांची संधी हुकल्याने त्यांनी पत्नी, वहिनी, आजी यांना रिंगणात उतरवले. काँग्रेस आणि ताराराणी असा थेट सामना रंगला. यामध्ये काँग्रेसच्या सुरेखा शहा यांनी बाजी मारली. ताराराणी आघाडीच्या वर्षा कुंभार यांना दुसऱ्या क्रमांकाची ११९० इतकी मते मिळाली. शिवसेनेच्या छाया कुंभार, मनीषा राणे यांनाही ५०० च्यावर मते मिळाली.

सुरेखा शहा यांनी पाच वर्षांत प्रभागासह शहरातील विविध समस्यांवर महापालिकेच्या सभागृहात आवाज उठवला. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदावर असताना त्यांनी उल्लेखनीय काम केले. शालिनी सिनेटोन आणि जयप्रभा स्टुडिओची जागा चित्रीकरणासाठीच आरक्षित राहावी, यासाठी त्यांनी लढा दिला. यंदाच्या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांनी निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. प्रभागातील नागरिकांच्या बैठकीत महाडिक कॉलनी येथील सामान्य कुटुंबातील सविता शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय झाला. सुरेखा शहा यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला असून, त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. शिंदे या सुशिक्षित उमेदवार असून, महापुरामध्ये मदतकार्य केले आहे. वहिनी मंचच्या माध्यमातून त्या १० वर्षांपासून सामाजिक कामात आहेत. १२ बचत गटांच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू असून, ही त्यांची जमेची बाजू आहे.

प्रकाश कुंभार (सरुडकर) यांनी २०१० ते २०१५ मध्ये महापालिकेत प्रतिनिधित्व केले असून, मागील निवडणुकीत त्यांनी या प्रभागातून वहिनी वर्षा कुंभार यांना रिंगणात उतरवले होते. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने त्यांनीही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जो आदेश देतील त्याप्रमाणे त्यांची पुढील दिशा असणार आहे. सविता शिंदे यांच्यासह अजित जाधव, किरण निकाळजे यांनीही गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यांच्यासह सुशांत शेवाळे, अनिल पोळ यांच्या नावांचीही चर्चा आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि ताराराणी आघाडीकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.

चौकट

मागील निवडणुकीतील प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

सुरेखा शहा (काँग्रेस) १५६९

वर्षा दत्तात्रय कुंभार (ताराराणी आघाडी) ११९०

छाया सतीश कुंभार (शिवसेना) ५७६

मनीषा श्रीकांत राणे (राष्ट्रवादी) ५३०

प्रतिक्रिया

पाच वर्षांत सुमारे ५ कोटींचा निधी आणाला. प्रभागातील रस्ते, गटारी, काँक्रिटीकरण अशी ७० टक्क्यांपेक्षा जास्त कामे केली. तारा ऑइल मिल परिसरातील ५० घरातील प्रॉपर्टीकार्डचा प्रश्न मार्गी लावला. राजीव गांधी झोपडपट्टी, लोणार वसाहत झोपडपट्टीतील १०० टक्के घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा मानस आहे.

चौकट

पाच वर्षांत झालेली विकासकामे

बापट कॅम्प, कत्तलखाना परिसरात १ कोटीच्या निधीतून बायोगॅस प्रकल्प

प्रभागातील झोपडपट्टी परिसरातील ३२५ घरांमध्ये शौचालयांची उभारणी

लोणार वसाहत येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र

महाडिक कॉलनीतील अंतर्गत सर्व रस्ते

राजीव गांधी वसाहतीत रस्ते, गटारी, काँक्रिटीकरण

लोणार वसाहतीमधील मनपाची डिजिटल शाळा, स्वच्छतागृह, पेव्हर ब्लॉक

बापट कॅम्प परिसरातील रस्ते

महाडिक कॉलनीत २५ लाखांच्या निधीतून ग्रंथालय

चौकट

शिल्लक असलेली प्रमुख कामे

शाहू मिल कॉलनीत गटारी करणे.

राजीव गांधी वसाहतीत विद्युत तारा भूमिगत करणे.

मन्नाडे मळा, मसुटे मळा येथील रस्ता खराब

तावडे हॉटेल परिसर, मन्नाडे मळा परिसरात पाण्याची समस्या

हद्दीच्या वादात बापट कॅम्प स्मशानभूमी येथील रस्त्याची दुरवस्था

फोटो : ०६०२२०२१ कोल मार्केट यार्ड प्रभाग

ओळी : कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू मार्केट यार्ड प्रभागातील बापट कॅम्प, साई गल्ली येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

Web Title: ‘Market Yard’ is a no-brainer for new candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.