गूळ खरेदीत मार्केटिंग फेडरेशनने उतरावे शेतकºयांची बैठकीत मागणी : साखरमिश्रित गुळामुळे कोल्हापुरी ब्रँड खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:47 AM2018-01-05T00:47:57+5:302018-01-05T00:48:06+5:30
कोल्हापूर : गुळाची मागणी कमी असल्याचे कारण सांगत व्यापारी गुळाचे दर पाडत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.
कोल्हापूर : गुळाची मागणी कमी असल्याचे कारण सांगत व्यापारी गुळाचे दर पाडत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी मार्केटिंग फेडरेशनने गूळ खरेदीत उतरावे, अशी मागणी गूळ उत्पादक शेतकºयांनी गुरुवारी बाजार समितीत आयोजित केलेल्या बैठकीत केली. साखरमिश्रित गुळामुळे कोल्हापुरी गुळाचा ब्रॅँड खराब झाल्याचेही यावेळी निदर्शनास आणून दिले. दरात सुधारणा न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.
उत्तम पाटील म्हणाले, गुळाचे उत्पादन तेवढेच राहिले; पण गूळ खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आपण पूर्वी घरात किती गूळ खात होतो आणि आता किती खातो, यासाठी गुळाचे मार्केटिंग व्हायला पाहिजे. बाजार समितीने पुढाकार घेऊन गुळातील पोषक घटकांचे मार्केटिंग करण्यासाठी पुढाकार घ्यावा. साखरमिश्रित गुळाचे प्रमाण वाढल्याचे सांगत रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे म्हणाले, गुजरातमध्ये गूळ शीतगृहात ठेवला जातो. साखरमिश्रित गूळ शीतगृहात वितळत असल्याने कोल्हापूरचे नाव खराब होऊन मागणी कमी होत आहे. त्याचा परिणाम दरावर होत असून राधानगरी तालुक्यातील चांदेचा गूळ कºहाडच्या मार्केटमध्ये जातो. तिथे चांगला दर मिळतो. मग येथे काय झाले?
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे राज्यातील वजनदार नेते आहेत. जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आला असताना त्यांनी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी दादासाहेब पाटील यांनी केली. केवळ मुहूर्ताच्या सौद्याला तुम्ही हजर राहू नका. रोज सौद्यात या, किमान तीनशे-चारशे रुपयांचा दरात फरक पडेल, अशी सूचना तानाजी आंग्रे यांनी केली. त्यावर आजपासून सौद्यात हजर राहून दर वाढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही सभापती कृष्णात पाटील यांनी दिली. उपसभापती अमित कांबळे, सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सापले, आदी उपस्थित होते.
काटेंवर शेतकरी भडकले
भगवान काटे तीन वेळा भाषणासाठी उठून तेच-तेच मुद्दा मांडत राहिल्याने शेतकरी संतप्त झाले. ‘भाषणबाजी बंद करा, दहा वर्षे हेच ऐकतोय; केवळ पेपरमध्ये नाव येण्यासाठी बोलू नका. बाजार समितीचे संचालक म्हणून दर घसरणीवर उपाय काय करणार, ते सांगा?’ असे संजय पाटील (वडणगे) यांच्यासह शेतकºयांनी सुनावले.
सदाभाऊंना भेटणार
गुळाच्या दराच्या घसरणीबाबत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रविवारी (दि. ७) भेट घेणार आहे. सरकारने मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून गूळ खरेदीत उतरावे, अशी मागणी करणार असल्याचे श्रीकांत घाटगे यांनी सांगितले.
गुळाची गुणवत्ता तपासणीस प्रयोगशाळा
व्यापारी गुळाच्या रव्यात चाकू मारून त्याची गुणवत्ता ठरवितात. ही पद्धत चुकीची असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. यावर गुळाच्या प्रतवारीसाठी लवकरच प्रयोगशाळा सुरू करीत असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.