Marriage: ७५ वर्षीय बाबुराव अडकले लग्नबंधनात; वृद्धाश्रमातच बांधल्या मुंडावळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 09:33 AM2023-03-02T09:33:17+5:302023-03-02T09:50:30+5:30
कोल्हापूरच्या शिरोल तहसील घोसरवाड येथील जानकी नावाच्या वृद्धाश्रमात लग्नाची सनई-चौघडा वाजला
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, प्रेम कुठल्याही वयात आणि कोठेही होऊ शकतं. प्रेमाच्या या व्याख्येची प्रचिती कोल्हापुरातील एका वृद्धाश्रमात आली आहे. संजय दत्तच्या लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील ओल्ड एज होममधील वृद्ध दाम्पत्य अखेर लग्नबंधनात अडकते आणि आपल्या प्रेमाची नव्याने सुरुवात करते, त्याचप्रमाणे कोल्हापुरातील एका वृद्ध दाम्पत्याने वृद्धाश्रमातच लग्नगाठ बांधली आहे. ७५ वर्षीय बाबुराव पाटील आणि ७० वर्षीय अनुसया शिंदे यांनी नवीन जीवनाची सुरुवात केली. शेटवच्या श्वासापर्यंत एकमेकांचा आधार बनून राहण्याची शपथच त्यांनी घेतली.
कोल्हापूरच्या शिरोल तहसील घोसरवाड येथील जानकी नावाच्या वृद्धाश्रमात लग्नाची सनई-चौघडा वाजला. आश्रमातील ७५ वर्षीय बाबुरा पाटील आणि ७० वर्षीय अनुसया शिंदे हे गेल्या २ वर्षांपासून राहत आहेत. बाबुराव यांच्या पत्नीचे निधन झाले आहेत, तर अनुसया यांच्याही पतीचे निधन झाले आहे. त्यामुळेच, हे दोघेही वृद्धाश्रमात एकमेकांचा सहारा, एकमेकांचा आधार बनून राहत होते. त्यातूनच, काही दिवसांपूर्वी बाबुराव यांनी अनुसया यांच्यावरील प्रेम व्यक्त केला. त्यानंतर, लग्नासाठी मागणीही केली. सुरुवातीला अनुसया यांनी लग्नासाठी नकार दिला. मात्र, ८ दिवसांनंतर मनपरिवर्तन होऊन अनुसया यांनी लग्नास होकार कळवला.
आश्रमाचे व्यवस्थापक बाबासाहेब पुजारी यांना दोन्ही वृद्धांबद्दल, त्यांच्या प्रेमाबद्दल माहिती कळाली. त्यानंतर, पुजारी यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत हिंदू परंपरेनुसार मोठ्या थाटामाटात दोघांचेही लग्न लावले. या लग्नात वृद्धाश्रमातील सर्वचजण आनंदाने सहभागी झाले होते. सर्वांनीच नवविवाहित दाम्पत्यास शुभेच्छा देत एकमेकांना आधार देण्याच्या त्यांच्या निश्चयाचं कौतुक केलंय.