लग्नाची गोष्ट; स्वागताच्या हजारो पोस्ट
By Admin | Published: December 23, 2016 12:38 AM2016-12-23T00:38:17+5:302016-12-23T01:06:28+5:30
स्त्री शक्तीचा सन्मान : ६१८० इ मेल, १४६४ व्हॉटस् अप मेसेज, शेकडो कॉल
भरत बुटाले -- कोल्हापूर---कोणतेही कार्य असो त्याला शुद्ध हेतूची जोड असेल, तर समाजात त्याचे जोरदार स्वागत होणारच, याची प्रचिती सातारा येथील सत्यम गुजर यांच्या नियोजित विवाहसोहळ्याच्या निमित्ताने येत आहे. १८ डिसेंबर २०१६ च्या ‘लोकमत’मध्ये ‘लग्नपत्रिकेसह सोहळ्यात स्त्री शक्तीचा सन्मान’ या मथळ्यांतर्गत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने स्वागताबरोबरच शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.
‘१ रुपया समाजकार्यासाठी’ हा उपक्रम सत्यात उतरविलेल्या सत्यम गुजर यांचा विवाह शनिवारी (दि. २४) सातारा येथे होत आहे. लग्नपत्रिकेतील निमंत्रकापासून ते प्रत्यक्ष सोहळ्यात महिलांना अग्रस्थान देऊन त्यांनी स्त्री शक्तीचा सन्मानच केला आहे.
तसेच अनावश्यक गोष्टींना फाटा देत सोहळ्यात समाजसुधारकांचे छायाचित्र, झाडांचे वाटप, १० अनाथ मुलांना भोजनाचा पहिला मान, आहेर म्हणून फक्त पुस्तकांचा स्वीकार असे वेगळेपण असणार आहे.
याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच त्यांच्या या उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
हे त्यांना आलेल्या इ-मेल (६,१८०), व्हॉटस् अप मेसेज (१४६४) आणि शेकडो फोन कॉलवरून दिसून येते.
‘फेसबुक’चा आधार
विशेष म्हणजे यातील बहुतेकांनी ‘सत्यम गुजर सातारा’ असे फेसबुकवर सर्च करून मोबाइल नंबर आणि इ-मेल अॅड्रेस मिळवून संपर्क साधला असून, ‘फेसबुक’द्वारेही त्यांच्याशी संपर्क साधून स्वागत केले आहे.
गेल्या चार दिवसांत आलेल्या मेसेज, फोन कॉल आणि प्रत्यक्ष भेटणाऱ्यांकडून ‘तुम्ही या कार्यातून वेगळेपण जपत आहात. महिलांना दिलेले प्राधान्य हेच स्वागतार्ह आहे.’ असे सांगणाऱ्या प्रतिक्रिया ऐकून आणि वाचून मी खूपच भारावून गेलो असून, माझी जबाबदारीही वाढली आहे.
- सत्यम गुजर
तुम्ही जे कार्य करत आहात ते अगदी माझ्या मनातले असल्यासारखे आहे. असे कार्य माझ्या काही घरगुती कार्यक्रमांमध्ये करायचे होते, पण ते करू शकलो नाही. तुम्ही जे धाडस केले आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. युवा पिढी अशाप्रकारे विचार करून वागू लागली तर समाजाचे प्रबोधन होईल.
- रवींद्र माटे, सातारा.