पोर्लेत बारा वर्षांच्या शाळकरी मुलीचा विवाह
By admin | Published: March 25, 2017 12:20 AM2017-03-25T00:20:27+5:302017-03-25T00:20:27+5:30
पोलिसांत तक्रार : मुलीस घेतले ताब्यात
कोल्हापूर : पोर्ले (ता. पन्हाळा) येथील कन्याशाळेत सहावीत शिकणाऱ्या बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची तक्रार निनावी फोनमुळे झाल्यामुळे पोलिस अधीक्षक महादेव तांबडे व जिल्हा महिला बालविकास अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. पन्हाळा पोलिसांनी जाफळे (ता.पन्हाळा) येथे वराच्या घरी जाऊन या मुलीस रात्री ताब्यात घेतले.
अत्यंत गरिबीची परिस्थिती व हातावरील पोट असल्यामुळे त्या कुटुंबाने ३ जानेवारी २००५ जन्मतारीख असलेल्या या मुलीचा विवाह काही दिवसांपूर्वी केला. तिच्या मोठ्या बहिणीचा विवाहही अल्पवयातच झाला आहे. आता विवाह झालेली मुलगी प्रकृतीने थोडी जाड आहे. त्याचा आधार घेऊन पालकांनी तिचा विवाह करून दिला. अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची माहिती येथील महिला दक्षता समितीकडे निनावी फोनद्वारे आली. त्यामुळे या समितीच्या तनुजा शिपूरकर, ‘अंनिस’च्या सीमा पाटील, गीता हसूरकर, रमेश वडणगेकर, संघसेन जगतकर, साक्षी महिला मंडळाच्या माया रणनवरे, प्रकाश रणनवरे, भारतीय महिला फेडरेशन ज्योती भालकर, आनंदी महिला जागृती संस्थेच्यावतीने सायंकाळी पोलिस अधीक्षक तांबडे यांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी केली. त्यांनी लगेच पन्हाळा पोलिसांना चौकशीचे आदेश दिल्यावर त्यांनी जाफळे येथे जावून या मुलीस ताब्यात घेतले. तिला येथील बालकल्याण संस्थेत दाखल केले जाणार आहे. (प्रतिनिधी)