लग्नाची गाठ मृत्यूनंतरही कायम..!
By Admin | Published: October 29, 2015 12:00 AM2015-10-29T00:00:18+5:302015-10-29T00:08:11+5:30
भडगाव येथील दाम्पत्याचा एकाच दिवशी मृत्यू
गडहिंग्लज : गंभीर आजारी असणाऱ्या पत्नीला मृत्यूच्या दाढेतून आपण आता वाचवू शकणार नाही, याची हाय खाऊन दवाखान्यातच पतीचा मृत्यू झाला, तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून नातेवाईक घरी परतण्याआधीच पत्नीनेही दवाखान्यात जीवनयात्रा संपविली. मंगळवारी (दि. २७) येथील उपजिल्हा रुग्णालयात ही हृदयद्रावक घटना घडली असून, लक्ष्मीबाई मारुती पट्टणकुडी (वय ५५) आणि मारुती कल्लाप्पा पट्टणकुडी (६५, रा. भडगाव) अशी या दुर्दैवी दाम्पत्याची नावे आहेत.
दि. २० रोजी दसऱ्याचा फराळ घेऊन लक्ष्मीबाई जरळी येथील नाईकवाडी वसाहतीत राहणाऱ्या दोन विवाहित मुलींकडे भडगावमधून चालत निघाल्या होत्या. दम्याच्या त्रासामुळे वाटेतच भोवळ येऊन पडल्यानंतर मुलींनीच त्यांना गडहिंग्लजमधील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे पती मारुती हे सुश्रूषा करीत होते; पण लक्ष्मीबाई यांचा आजार बळावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याची सूचना डॉक्टरांनी केली. नातेवाइकांनी लक्ष्मीबाई यांना मंगळवारी (दि. २७) सकाळी कोल्हापूर येथे हलविण्याची तयारी केली; पण बेताची आर्थिक स्थिती आणि न परवडणाऱ्या खर्चाचा विचार करीत रुग्णालयात जेवण घेऊन आलेल्या मारुती यांना भोवळ आली आणि उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
लक्ष्मीबाई यांना कोल्हापूरला नेण्याचे तात्पुरते स्थगित करून मारुती यांच्यावर नातेवाइकांनी भडगाव येथील बेरड समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. जड अंत:करणाने परतणारे नातेवाईक घरी पोहोचण्याआधीच लक्ष्मीबार्इंचीही रुग्णालयात प्राणज्योत मालवली. पुन्हा संध्याकाळी उशिरा त्यांचाही मृतदेह मारुती यांच्या शेजारीच दफन करण्यात आला.
मात्र, एकाच दिवशी एका पाठोपाठ झालेल्या दोघांच्या मृत्यूने भडगाव गावावर शोककळा पसरली. (वार्ताहर)