कोल्हापूर: विवाहितेने सहा महिन्याच्या बालिकेसह घेतली विहिरीत उडी, बालिकेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 12:35 PM2022-09-16T12:35:01+5:302022-09-16T12:35:44+5:30
मोनिकाला पोहता येत असल्याने ती विहिरीच्या काठाला आली. त्यानंतर तिला नागरिकांनी बाहेर काढलं. मात्र, या घटनेत बालिकेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
सुधाकर पाटील
वडणगे : वडणगे ता. करवीर येथील महिलेने सहा महिन्याच्या बालिकेसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये बालिकेचा बुडून मृत्यू झाला. तनुजा परशुराम चव्हाण (वय-६ महिने) असे त्या दुर्देवी बालिकेचे नाव आहे. तर आई मोनिका परशुराम चव्हाण (वय-२०) ला स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. पती-पत्नी मधील घरगुती वादातून पहाटेच्या दरम्यान ही घटना घडल्याचे माहिती समोर आली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील वडणगे-बावडा मार्गावरील चौगले मळ्यात परशुराम चव्हाण हे आपल्या कुटुंबासह राहते. आज पहाटे साडे पाचच्या सुमारास त्यांची पत्नी मोनिका आपल्या सहा महिन्याच्या तनुजा या मुलीला घेऊन घराबाहेर पडली. घराजवळच असलेल्या विहिरीत तिने मुलीसह उडी घेतली.
विहीरीजवळ असलेल्या नागरिकांच्या ही घटना निदर्शनास आल्याने त्यांनी आरडाओरड केला. मोनिकाला पोहता येत असल्याने ती विहिरीच्या काठाला आली. त्यानंतर तिला नागरिकांनी बाहेर काढलं. मात्र, या घटनेत बालिकेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने स्क्युबा डायव्हिंग तंत्राचा वापर करून मुलीचा मृतदेह शोधून काढला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली.