मंगल कार्यालयास २५ वर्षे घरफाळाच नाही
By admin | Published: June 26, 2015 01:06 AM2015-06-26T01:06:01+5:302015-06-26T01:06:01+5:30
भूपाल शेटे : अधिकाऱ्यांनी ७० लाखांचा ढपला पाडला; फौजदारी दाखल करणार
कोल्हापूर : महापालिकेच्या ताराराणी विभागीय कार्यालयाशेजारीच असलेल्या अक्षता मंगल कार्यालयाने गेली २५ वर्षे घरफाळाच भरलेला नाही. करनिर्धारण अधिकाऱ्यांच्या संगनमताने महापालिकेचे तब्बल ७० लाखांचे नुकसान केले आहे. यामध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी प्रशासनाने कारवाई न केल्यास महिनाभरात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा शेटे यांनी दिला आहे.
स्टेशन रोडवरील मिळकत क्रमांक ५१७/ब येथील यात्री निवास व अक्षता मंगल कार्यालय या मिळकतींची घरफाळा विभागात (असेसमेंट नोंद) नोंदच आढळून येत नाही. १९९८ पासून या मिळकतींचा मालमत्ता कर भरलेला तपशील आढळत नाही. दरम्यान, मिळकतीचे असेसमेंट करून कराची आकारणी पूर्वलक्षी प्रभावाने करून संबंधितांकडून ती वसूूल करावी, अशी नोटीस १० दिवसांपूर्वी पाठविली असल्याचे करनिर्धारण अधिकारी दिवाकर कारंडे यांनी नगरसेवक भूपाल शेटे यांना (व. शि. १/९१/२०१५/दि. २३-०६-२०१५) लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
मिळकतधारक रवींद्र प्रभू यांचेकडून दंडासह रकमेची वसुली झाली पाहिजे. या मिळकतीचा घरफाळा न घेण्यास जबाबदार असलेल्या तत्कालीन सर्जेराव चव्हाण, विजय कराळ, संजय भोसले, दिलीप कोळी, दिवाकर कारंडे या अधिकाऱ्यांवर, तसेच कर्मचाऱ्यांवर परतफेडीची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी शेटे यांनी केली आहे. महापालिकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या या अधिकारी व मिळकतधारकाविरोधात फौजदारी दाखल करणार असल्याचेही शेटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आयुक्त कोणती भूमिका घेणार?
घरफाळा विभागातील दररोज एक घोटाळा पुढे येत आहे. शहरातील तीन हजारांहून अधिक मिळकतधारकांना बेकायदेशीर दंड व व्याजाच्या रकमेत सूट देत कर्मचारी व अधिकाऱ्यांनी महापालिकेचे तीन कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. या प्रकरणी संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर आयुक्त पी. शिवशंकर यांनी अद्याप कारवाई केलेली नाही. आता या नव्या घोटाळ्याप्रकरणी आयुक्त कोणती भूमिका घेणार, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.