व्यापार, व्यवसाय बंद ठेऊन शहीद जवानांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 08:27 PM2019-02-18T20:27:23+5:302019-02-18T20:28:36+5:30
कोल्हापूर शहरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, गुजरी, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक, आदी परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन, सोमवारी शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे गुजरी परिसरात सकाळी निषेध फेरी काढण्यात आली.
कोल्हापूर : शहरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, गुजरी, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक, आदी परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन, सोमवारी शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे गुजरी परिसरात सकाळी निषेध फेरी काढण्यात आली.
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ आणि या हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी कॉन्फिडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने देशभरातील व्यापारी, व्यावसायिकांना सोमवारी बंद पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार कोल्हापूर शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली.
गुजरी परिसरातील सराफ व्यावसायिकांनी दुकाने, पेढी बंद ठेवल्या. कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे सकाळी नऊ वाजता गुजरी मेनरोड, महाद्वार रोड, भेंडे गल्ली, कासार गल्ली, भाऊसिंगजी रोड, आझाद गल्ली मार्गावर निषेध फेरी काढण्यात आल्या. यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान को जला दो’, अशा निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
या फेरीमध्ये सराफ संघाचे उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड, सचिव माणिक जैन, विजय हावळ, किरण गांधी, जितेंद्र राठोड, महेंद्र ओसवाल, बाळू पाटील, प्रकाश ओसवाल, नीलेश ओसवाल, जवाहर गांधी, संजय ओसवाल, आदी सहभागी झाले. महाद्वार रोड, जोतिबा रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक, लुगडी ओळ, बिंदू चौक, शिवाजी रोड, हत्तीमहल रोड, गंगावेश, शाहूपुरी, राजारामपुरी परिसरातील दुकाने बंद होती.
बहुतांश फेरीवाल्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतला; त्यामुळे नेहमी गजबजलेल्या या परिसरात शुकशुकाट पसरला होता. लक्ष्मीपुरी परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद लाभला. काही मेडिकल दुकाने, हॉटेल सुरू होती. शहरातील विविध व्यापारीपेठांमध्ये शहीद जवानांना अभिवादन करणारे, आदरांजली वाहणारे फलक लावण्यात आले आहेत.
तीन लाखांची मदत जमा
या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने पाच लाखांचा निधी जमा करण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत तीन लाखांचा निधी जमा झाला आहे. बंद पाळून आम्ही शहीद जवानांना आदरांजली वाहिली असल्याचे उपाध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सांगितले.