युवकांत शहिदांचा आदर्श कौतुकास्पद : क्रांतिकारकांचे वंशज कोल्हापुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:54 AM2019-04-02T00:54:20+5:302019-04-02T00:55:19+5:30
शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी देशासाठी दिलेले बलिदान फार मोठे आहे. याच शहिदांचा आदर्श घेऊन आजची पिढी देशप्रेम आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे,
कोल्हापूर : शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी देशासाठी दिलेले बलिदान फार मोठे आहे. याच शहिदांचा आदर्श घेऊन आजची पिढी देशप्रेम आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे, हे कौतुकास्पद आहे. कोल्हापुरातील अनोखे स्वागत पाहून भारावून गेलो आहे, अशा भावना अभय सिंग, आनुज थापर आणि सत्यशील राजगुरू यांनी व्यक्त केल्या.
कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, साथी फाउंडेशन, वुई कॅन फाउंडेशन व मराठा रणरागिणींतर्फे शहीद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी शहीद भगतसिंग यांचे पुतणे अभय सिंग, सुखदेव यांचे नातू आनुज थापर आणि राजगुरू यांचे नातू सत्यशील राजगुरू हे सोमवारी कोल्हापुरात आले. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
रुईकर कॉलनी येथे कोल्हापुरी फेटा बांधून मिरवणुकीस प्रारंभ झाला. हलगीच्या कडकडाटामध्ये मिरवणूक ताराराणी पुतळा येथे आली. या ठिकाणी ‘भारत माता की... जय, वंदे मातरम्, इन्कलाब जिंदाबाद, शिवाजी महाराज की... जय’, असा जयघोष करत ताराराणी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आनुज थापर म्हणाले, देशप्रेमाचे विचार आज दृढ होणे गरजेचे आहे. शहीद जवानांपासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे.
सत्यशील राजगुरू म्हणाले, तरुण पिढीचे देशाप्रती असलेले कर्तृत्व प्रत्येक नागरिकांनी ओळखले पाहिजे. सामाजिक कार्यात युवकांनी अग्रेसर राहणे गरजेचे आहे.
अभय सिंग म्हणाले, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आपण देशसेवेसाठी नेहमी अगे्रसर राहिले पाहिजे. यावेळी सरोज पाटील, भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे, संयोजन समितीचे जितेंद्र बामणे, निखिल शिंदे, विनय गुरव, पंकज आणेकर, सुनील रेडेकर, पृृथ्वीराज महाडिक, मनीषा जाधव, संजीवनी देसाई, सीमा पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज व्याख्यान
‘क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांशी संवाद’ हा कार्यक्रम राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात आज, मंगळवारी सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत होणार आहे. त्यानिमित्ताने क्रांतिकारकांचे हे वंशज पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. या कार्यक्रमात शहिदांवरील चित्रफीत दाखविण्यात येईल. देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. क्रांतिकारकांचे वंशज प्रमुख उपस्थित राहणार आहेत.