शहीद शेतकरी, शहीद सैनिक अमर रहे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:22 AM2021-02-15T04:22:42+5:302021-02-15T04:22:42+5:30
कोल्हापूर : दिल्लीतील आंदोलनात शहीद झालेले शेतकरी व पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिक यांना रविवारी कोल्हापूरकरांनी बिंदू चौकात एकत्र जमून, ...
कोल्हापूर : दिल्लीतील आंदोलनात शहीद झालेले शेतकरी व पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिक यांना रविवारी कोल्हापूरकरांनी बिंदू चौकात एकत्र जमून, मेणबत्त्या पेटवून अभिवादन केले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ‘शहीद शेतकरी अमर रहे, शहीद सैनिक अमर रहे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिल्लीत आंदोलनाच्या ७७व्या दिवसाचे औचित्य साधून शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या उद्देशाने रविवारी देशभर कँडल मार्चचे आवाहन केले होते. त्यानुसार कोल्हापुरात समन्वय समितीचे सतीशचंद्र कांबळे, रवी जाधव, रघुनाथ कांबळे, बाबूराव कदम, संभाजीराज जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मेणबत्त्या पेटवून शहिदांना अभिवादन करताना केंद्र सरकारच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला.
या कँडल मार्चमध्ये इर्शाद फरास, दिलदार मुजावर, बी. एल. बर्गे, सिद्धार्थ कांबळे, कमलाकर रोटे, आशा बर्गे, टी. एस. पाटील, बाबा मिठारी, मधुकर हरेल, सदा भालकर, नामदेव उलपे, उज्ज्वला कदम, यशवंत पाटील, संग्राम माने, विजय लोंढे, शिवाजी पाटील हे सहभागी झाले.
चौकट ०१
भाजपच्या मंत्र्यांचा निषेध
भाजपशासित हरियाणाचे कृषिमंत्री जयप्रकाश दलाल यांनी आंदोलनातील शेतकरी हे हार्ट अटॅक व ताप येऊन मेलेले आहेत, ते घरी असते तरी मेलेच असते, असे वक्तव्य केले आहे. दलाल यांच्या या वक्तव्याचा कँडल मार्चच्या ठिकाणी तीव्र शब्दांत निषेध करून त्यांच्या विरोधात घोषणाही दिल्या गेल्या. शेतकऱ्यांप्रती भाजपची हीच का ती संवेदनशीलता? असा सवालही यावेळी करण्यात आला.
फोटो: १४०२२०२१-कोल-कॅन्डल मार्च
फाेटो ओळ : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने रविवारी सायंकाळी कोल्हापुरातील बिंदू चौकात मेणबत्त्या पेटवून शहीद शेतकरी व पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांना अभिवादन केले.