रेहानकडून मारुती जाधव चितपट
By admin | Published: December 30, 2014 11:04 PM2014-12-30T23:04:07+5:302014-12-30T23:25:26+5:30
चरण कुस्ती मैदान : योगेश बोबाळेचा खेळण्यास नकार
येळापूर : चरण (ता. शिराळा) येथील गजानन देवाची यात्रा व चॉँदसाहेब उरूसानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीमध्ये पंजाब केसरी रेहान खानने महाराष्ट्र चॅम्पियन मारुती जाधव याच्यावर सहाव्या मिनिटाला गदालोट डावावर विजय मिळवून हजारो कुस्ती शौकिनांची मने जिंकली. याच क्रमांकासाठी झालेल्या दुसऱ्या कुस्तीमध्ये योगेश बोबाळे याने कुस्ती खेळण्यास नकार दिल्याने भारत कुमार केसरी परविंदरकुमार यास पंचांनी विजयी घोषित केले. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी गटातील सहा मल्लांच्या तसेच उत्तर भारतातील तीनजणांच्या कुस्त्या या मैदानात घेण्यात आल्या.
प्रारंभी कुस्ती मैदानाचे उद्घाटन बी. के. नायकवडी व यात्रा कमिटी अध्यक्ष नाना यशवंत नायकवडी, डॉ. ए. डी. नायकवडी यांच्याहस्ते करण्यात आले.
द्वितीय क्रमांकासाठी दोन कुस्त्या घेण्यात आल्या. यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन राजेंद्र सुळने पंजाब केसरी मनप्रित सिंग याच्यावर एकलंगी भरून नागपट्टी डावावर, तर दुसऱ्या लढतीत कोल्हापूरच्या विजय गुटाळ याने सातारच्या अमोल फडतरे यास घिस्सा डावावर चितपट केले. प्रेक्षणीय लढतीमध्ये ज्ञानेश्वर हांडे, संजय जाधव, दत्ता नरळे, विक्रम चव्हाण, अजय निकम, सुरेश चव्हाण यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला. त्यांच्यावर कुस्ती शौकिनांनी बक्षिसांचा वर्षाव केला.
मैदानातील विजयी मल्ल असे- नामदेव केसरे, अक्षय जाधव, चेतन पाटील, पप्पू मिस्किन, कुमार पाटील, प्रदीप माने, अनिल नायकवडी, नितीन माने, किरण शेडगे, अक्षय सूर्यवंशी, अरविंद पाटील, संग्राम नायकवडी, सूरज इंगळे, सूरज पाटील, रोहित इंगळे, उमेश नायकवडी, सागर घोडे, अमर पाटील, मारुती सावंत, प्रकाश जाधव, चेतन पाटील, दत्ता बनकर, संग्राम पावले, प्रवीण माने, प्रदीप पाटील, अमोल माने, प्रशांत पाटील, वैभव लोहार, कपिल पाटील.
मैदानात आमदार शिवाजीराव नाईक, ‘हुतात्मा’चे मार्गदर्शक वैभव नायकवडी, डी. आर. जाधव, रणधीर नाईक, माथाडी नेते बबनराव चिंचोळकर, डॉ. संजय कुंभार, रंगराव शेडगे, मोहन पाटील, सुखदेव पाटील, उपमहाराष्ट्र केसरी शिवाजी लाड, उपसरपंच लक्ष्मण पाटील, तैय्यब नायकवडी, लक्ष्मण डुबल, हरिबा लोहार उपस्थित होते.
बंडा पाटील-रेठरेकर, उपमहाराष्ट्र केसरी संपत जाधव, दत्ता आंदळकर, नंदकुमार पाटील, भास्कर नायकवडी, विजय मुझुमले यांनी पंच म्हणून काम पाहिले, तर ईश्वरा पाटील यांनी निवेदन केले. (वार्ताहर)