मसाई पठारावरील ‘मसाई’च गायब

By admin | Published: June 8, 2015 09:32 PM2015-06-08T21:32:49+5:302015-06-09T00:12:09+5:30

तपास ‘जैसे थे’ : फक्त पठारच शिल्लक; अंधश्रद्धा की चोरी? ग्रामस्थांत चर्चा

'Masai' missing on Masai Plateau | मसाई पठारावरील ‘मसाई’च गायब

मसाई पठारावरील ‘मसाई’च गायब

Next

कोतोली : कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ९०० एकर क्षेत्र असलेल्या पठारावरील मसाई देवीच्या मंदिरातील पाच मूर्तींची चोरी झाली आहे. या घटनेला आठवडा लोटला तरी याबाबत तपास ‘जैसे थे’ आहे. यामुळे भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पौर्णिमेच्या रात्री मंदिरामधील सिंहासनावरील बैठी मसाईदेवीची दगडी मूर्ती, त्याचबरोबर तीन संगमरवरी मूर्ती, सहा घोडे अशा मूर्ती चोरीला गेल्या आहेत. या चोरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, तर याबाबत कोडोली पोलिसांनी तपास सुरू आहे असे सांगून आपले हात वर केले आहेत. या चोरीमुळे जिल्ह्यातील जागृत देवस्थानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजाअर्चा करण्यासाठी गेलेले मसाई देवीचे पुजारी गणपती दळवी यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यावेळी त्यांनी या चोरीच्या प्रकाराची माहिती कोडोली पोलीस ठाण्यात दिली. मसाई देवी ही कौल घेणे, कौल देणे अशा बाबतीत प्रसिद्ध आहे. यामुळे प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी या मसाई मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
सोमवारी (दि. १) पौर्णिमा होती. त्याच रात्री मसाई पठारावरील पाच मूर्तींच्या चोरीचा प्रकार घडला असून, पूर्वकालीन असलेल्या या दगडाच्या मूर्तींचे वजनही १५० ते २०० किलो एवढे होते, असे ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे मूर्ती चोरणारे एक-दोघे नसणार असा प्राथमिक अंदाज परिसरातील नागरिकांनी लावला आहे. पूर्वी पठारावर जाण्यासाठी वाट नव्हती. पर्यटकांचा विचार करून बुधवार पेठमार्गे मसाई पठारावर येण्यासाठी रस्ता करण्यात आला होता; पण या रस्त्याचा उपयोग मात्र चोरट्यांनी चोरीच्या कामासाठी केला.
सुमारे ९०० एकरांचे पठार असून, या ठिकाणी पांडवकालीन गुहा आहेत. पन्हाळ््याबरोबर मसाई पठारही प्रेमीयुगुलांचे मोक्याचे ठिकाण बनले होते, पण पौर्णिमेच्या रात्री मंदिरातील मूर्ती चोरीला गेल्याने अंधश्रद्धेचा विषय परिसरात जोरात सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला चोरट्यांनी या पूर्वकालीन मूर्ती विक्री करण्यासाठी तरी चोरल्या नसतील ना? अशी शक्यताही जोर धरत आहे. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गोष्टींचा विचार करून तपास करणे गरजेचे आहे.

देवीच्या २५ साड्या, एक सूप भरून कुंकू व दोन हजार रुपये मंदिराच्या बाहेर आढळून आल्याचे परिसरातील नागरिकांत बोलले जात आहे. त्यामुळे ही चोरी अंधश्रद्धेच्या माध्यमातून झाली असल्याचा अंदाज लावला जात आहे.
९०० एकरांच्या पठारावरील मंदिरातील पौर्णिमेच्या रात्री पाच मूर्ती चोरीला जाणे व त्या ठिकाणी पारंपरिक विधी घेणे ही गोष्ट अंधश्रद्धेची आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन विभागानेही लक्ष घालावे.


मसाई पठारावरील मूर्ती चोरीला जाणे, ही गोष्टच लाजिरवाणी असून, या चोरीच्या मागे धर्मांध शक्तीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. - बाजीराव उदाळे, सरपंच, वाघवे

Web Title: 'Masai' missing on Masai Plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.