मसाई पठार 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित, जैवविविधता संरक्षणासाठी उचलले पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 06:45 PM2022-06-06T18:45:52+5:302022-06-06T18:49:32+5:30
हिरव्यागार गवताची शाल पांघरलेले १० किलोमीटरचे पठार, २०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ्या १० पठारांचे मिळून बनलेले हे पठार पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठे आहे.
कोल्हापूर : जैव विविधतेने नटलेल्या कोल्हापूरपासून अवघ्या ३५ कि.मी.वर असणारे मसाई पठार आता राज्य सरकारने 'संवर्धन राखीव क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे. राज्य सरकारने आज झालेल्या बैठकीत नव्या १२ संवर्धन क्षेत्रांची घोषणा केली, त्यात मसाईचा समावेश आहे. जैवविविधता संरक्षणासाठी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमींनी दिली आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण १५ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील ८ क्षेत्रांना गत दोन वर्षांत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये या नव्या १२ संवर्धन क्षेत्रांची भर पडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १८ वी बैठक आज वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. बैठकीस यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह वन्यजीव मंडळाचे सदस्य, तज्ज्ञ तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आदि दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा वन परिक्षेत्रातील ५.३४ चौरस किमी क्षेत्र हे 'मसाई संवर्धन राखीव क्षेत्र' (कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे मसाई पठार परिसरातील समृद्ध जैवविविधतेचे संवर्धन होणार असून तिथल्या वन्यजीवांच्या भ्रमणमार्गाचेही रक्षण होण्यास मदत होणार आहे.
पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठे
पन्हाळ्यापासून अवघ्या सात किलोमीटरवर असणाऱ्या या पठारावर जाण्यासाठी बुधवारपेठ, आपटी, म्हाळुंगे मार्गे जावे लागते. घाट चढून वर गेले की म्हाळुंगे गावातून मसाई पठारावर पोहोचता येते. हिरव्यागार गवताची शाल पांघरलेले १० किलोमीटरचे पठार, २०० ते ८०० फूट रूंद अशा वेगवेगळ्या १० पठारांचे मिळून बनलेले हे पठार पाचगणीच्या टेबल लँड पेक्षाही मोठे आहे.
एका बाजूला पांडवकालीन लेणी
मसाईच्या एका टोकापासून दुसरे टोक साधारण ४ ते ५ किलोमीटर आहे. या दुसऱ्या टोकावरच मसाई देवीचे छोटेसे एक मंदिर आहे, त्यामुळे या पठाराला मसाई पठार नाव पडले. पठारावर जांभ्या दगडात खणलेले जुने तलाव देखील आहेत. एका बाजूला इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकातील पांडवकालीन लेणी आहेत.