कोरोनापेक्षा मास्कच बरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:35 AM2021-02-23T04:35:16+5:302021-02-23T04:35:16+5:30
कोल्हापूर : कोरोना पुन्हा सक्रिय झाल्याच्या वार्तेने कोल्हापूरकरांनी तोंडावर मास्क चढवले आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना कमालीची दक्षता घेतली जात ...
कोल्हापूर : कोरोना पुन्हा सक्रिय झाल्याच्या वार्तेने कोल्हापूरकरांनी तोंडावर मास्क चढवले आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना कमालीची दक्षता घेतली जात आहे. बाजारपेठामध्ये गर्दी दिसत असली तरी काही अपवाद वगळता मास्क लावलेल्या चेहऱ्यांची संख्या जास्त दिसत आहे. काेरोना हाेण्यापेक्षा मास्क लावलेला बरा, अशी मानसिकता लोकांमध्ये दृढ झालेली दिसत आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मास्क वापराची सक्ती केली असून टाळाटाळ करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश काढले आहेत. बाहेर वावरताना मास्क घालावाच लागेल, न घालणाऱ्यांवर फौजदारी कारवाईदेखील कारवाई करण्यास मागे हटू नये, असे कडक आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्याने सर्वत्र कारवाईचा धडाका सुरू झाला आहे.
कोल्हापुरात रविवार सुट्टीचा दिवस असल्याने खरेदीसाठी रस्त्यांवर बऱ्यापैकी गर्दी होती, पण मास्क वापरुन स्वत:च दक्षता घेतल्याचे आशादायी चित्र सर्वत्र दिसत होते. रविवारी लक्ष्मीपुरीत आठवडा बाजारात गर्दी होती, पण मास्क वापरणारेही जास्त दिसत होते. आम्हाला कशाचीही पर्वा नाही, असा आविर्भाव असणारेही नागरिक दृष्टीस पडत होते. त्यात परगावाहून, बाहेरील राज्यातून येणारे नागरिक जास्त असल्याचे दिसत होते. अंबाबाई मंदिरातही गर्दी होती, पण तेथेही सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर आणि मास्कची सक्ती होती. येणारे भाविकही मास्क वापरुनच ये-जा करत हाेते. मध्यवर्ती बसस्थानकातही सुट्टीमुळे गर्दी होती, पण तेथेही बऱ्यापैकी मास्कधारी चेहरे दिसत होते. महाद्वार रोडवर कायमच गर्दी असते. तेथे मात्र मास्क न वापरणाऱ्यांची संख्या जास्त दिसत होती.
फोटो: २१०२२०२१-कोल-कोरोना लक्ष्मीपुरी
फोटो ओळ: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कोल्हापूरकरांनी मास्कला जवळ केल्याचे आशादायी चित्र रविवारी शहरात सर्वत्र दृष्टीस पडत होते. लक्ष्मीपुरी बाजारात अशी गर्दी होती, पण मास्क वापरणारेही जास्त होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो: २१०२२०२१-कोल-कोरोना लक्ष्मीपुरी ०१
फोटो ओळ: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर वाढल्याचे आशादायी चित्र लक्ष्मीपुरीत दिसत असताना असे मास्कविना फिरणारेही दृष्टीस पडत होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो: २१०२२०२१-कोल-कोरोना सीपीआर
फोटो ओळ: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीपीआरमधील कोरोना केअर सेंटरच्या समोरील वातावरण धीरगंभीर होते. मास्कसह नागरिकांचा संचार सुरू होता. (छाया : नसीर अत्तार)
फोटो: २१०२२०२१-कोल-कोरोना लक्ष्मीपुरी ०२
फोटो ओळ : कोरोनापासून आणि दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी नागरिक तोंडावर मास्क, रुमाल लावून फिरत आहेत. मात्र, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या परिसरात ट्रॅफिक पोलीस मात्र मास्क हुनवटीला लावून फिरत असल्याचे विरोधाभासी चित्र दिसत होते. (छाया: नसीर अत्तार)
फोटो: २१०२२०२१-कोल-कोरोना पर्यटक
फोटो ओळ: सलग सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मात्र, ते मास्कची शिस्त पाळत नसल्याचे दिसते. रविवारी शिवाजी पुतळा चौकात वावरणाऱ्या सहापैकी केवळ एकाच महिलेच्या चेहऱ्यावर मास्क होता. बाकीचे मुक्त संचार करत होते.
(छाया: नसीर अत्तार)