CoronaVirus News Kolhapur: मास्कमुळे बचत गटांना मिळाली उभारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 05:00 AM2020-05-02T05:00:55+5:302020-05-02T05:03:44+5:30
सुरुवातीच्या काळात मास्क, सॅनिटायझरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्याने त्यांची टंचाई जाणवू लागली. सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर तर परिस्थिती आणखी गंभीर झाली.
समीर देशपांडे
कोल्हापूर : कोरोनाच्या या भयानक संकटावेळीही कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी ५० लाख रुपयांच्या मास्कची विक्री केली आहे. ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा परिषदेपर्यंत विविध संस्थांना त्यांनी हा पुरवठा केला आहे. गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरामध्ये प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीच्या काळात मास्क, सॅनिटायझरची मागणी प्रचंड प्रमाणात वाढल्याने त्यांची टंचाई जाणवू लागली. सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर तर परिस्थिती आणखी गंभीर झाली. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बचत गटांच्या माध्यमातून मास्क निर्मिती करण्यासाठी सूचना दिल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास यांनी जिल्'ातील सर्व बचत गटांना सक्रिय करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
स्थानिक पातळीवर बाजारपेठेतून कापड पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना शिवणकामाचे कौशल्य प्राप्त असल्याने मोठ्या प्रमाणावर लागणाºया मास्कचा पुरवठा त्यांनी करावा यासाठी त्यांना उद्युक्त करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील २८८ बचत गटातील १२५४ महिलांनी कंबर कसली आणि मास्कची निर्मिती करण्याच्या कामास सुरुवात केली.
गावपातळीवरही मास्कची मागणी वाढू लागल्याने ग्रामपंचायती, मेडिकल स्टोअर्स यांच्याकडून बचत गटांनी तयार केलेल्या मास्कना मागणी वाढू लागली. अनेक स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळांनी हे मास्क विकत घेऊन गरजूंना वितरित केले. या महिलांचा उत्साह पाहिल्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानेही २० लाख रुपयांच्या मास्कची आॅर्डर या महिला बचत गटांना दिली आहे. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनीही बचत गटांकडून ही खरेदी केली
आहे.
अशा प्रकारे गुरुवारअखेर चार लाख ३२ हजार ७९१ मास्क बचत गटाच्या महिलांनी तयार केले असून, त्याची एकूण किंमत ५० लाख ७७ हजार ६१० इतकी होते. या कोरोनाच्या काळातही या महिलांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
>राज्यातील महिला बचत गटांनी लॉकडाउनच्या काळातही मास्कसह अन्य वस्तू तयार कराव्यात, असे आवाहन मी केले होते. माझ्याच कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या माझ्या भगिनींनी ५० लाख रुपयांच्या मास्कची विक्री केली. राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून माझ्यासाठी हे अभिमानास्पद आहे.
- हसन मुश्रीफ,
ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य