पक्षांतर्गत आघाड्यांमध्येच सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:24 AM2020-12-22T04:24:24+5:302020-12-22T04:24:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या, बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे गावगाड्यातील राजकीय हालचाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उद्या, बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे गावगाड्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. पक्षीय पातळीवर निवडणुका न लढता पक्षांतर्गत आघाड्यामध्येच सामना पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे आघाड्यांसाठी जोडण्यांना वेग आला असून, अनेक गावात भाऊबंदकी उफाळून येणार, हे निश्चित आहे.
जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींसाठी उद्यापासून रणधुमाळी सुरू होत आहे. मर्यादित मतदान, त्यात नात्यागोत्यातील लढतीने ग्रामपंचायत निवडणुकीत अधिक ईर्ष्या निर्माण होते. प्रभाग निश्चितीपासूनच गावपातळीवरील राजकारण सुरू होऊन प्रभाग आरक्षणानंतर त्यास गती येते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत असल्याने गावगाड्यातील राजकारणाला चांगलीच उखळी फुटली आहे. एरव्ही पक्षावर निष्ठा ठेवून नेत्यांसाठी एकदिलाने काम करणारे स्थानिक गट ग्रामपंचात निवडणुकीत मात्र एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. त्यामुळे अनेक गावांत पक्षांतर्गतच आघाड्यामध्येच सामना होणार आहे.
प्रभागनिहाय ताकदवान उमेदवारांचा शोध घेतला जात असून, शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे. कोणाचा प्रभाव कोणत्या भागात आहे, त्यानुसार उमेदवारांची निवड केली जात आहे. एकाच जागेवर दोन-तीन इच्छुक असल्याने उमेदवारी कोणाला द्यायची? ही पॅनेलप्रमुखांसमोर डोकेदुखी आहे. इतर संस्थेत संधी देण्याचे आश्वासन देऊन बंडोबा थंड होतो का? याची चाचपणीही नेतृत्वाला करावी लागत आहे. आघाड्यांच्या राजकारणात जागा वाटपांवर अनेक ठिकाणी पेच निर्माण झाले आहेत. इच्छुकांकडून मतदारांच्या गाठीभेटी सुरू झाल्याने ऐन थंडीत गावगाड्यातील राजकारण तापू लागले आहे.
सरपंच आरक्षणासाठी ठोकताळे
ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण काढले जाणार असल्याने इच्छुकांची कोंडी झाली आहे. मागील दोन पंचवार्षिकमध्ये कोणते आरक्षण होते, आता काय पडू शकते. याचे ठोकताळे बांधले जात आहेत.
दाखल्यांसाठी धावाधाव
ग्रामपंचायत निवडणूक अचानक जाहीर झाल्याने राखीव गटातील इच्छुकांची गोची झाली आहे. ज्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत, तिथे इच्छुकांची धावाधाव सुरू झाली आहे.
- राजाराम लोंढे