‘भोगावती‘साठी ठरावांची जुळवाजुळव
By admin | Published: October 28, 2016 11:37 PM2016-10-28T23:37:33+5:302016-10-28T23:37:33+5:30
इच्छुकांची मोठी यादी : दोन्ही काँग्रेससह शेकाप, जनता दल, भाजप, शिवसेनाही उतरणार रिंगणात
बाजीराव फराकटे -- शिरगाव -भोगावती साखर कारखाना निवडणुकीसाठी संस्थांचे ठराव गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी गेले काही दिवस वेगवेगळ्या समारंभांच्या निमित्ताने नेत्यांकडे आपआपली फिल्डिंग लावण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे.‘भोगावती’चे एकदा संचालक झाले की, पुढील अनेक पिढ्या बसून खायचे, असा आता रिवाजच बनला आहे. निवडणुकीच्या दरम्यान साम, दाम, दंड, भेद अशा वेगवेगळ्या मार्गाने निवडून येण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. कारखान्याची आर्थिक परिस्थिती १९८४ ते ८९ या दरम्यान अतिशय चांगली हाती. त्यावेळी हा कारखाना शेकापचे नेते व आमदार गोविंदराव कलिकते यांच्या ताब्यामध्ये होता. त्यांच्या कारकिर्दीत सभासद व कामगारवर्गही खूश होता. त्यानंतर १९८९ ला सत्तांत्तर झाले. या काळात सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या मंडळींनी कारखान्याच्या विस्तारीकरणात तर अक्षरश: हात धुऊन घेतले. या पॅनेलचे नेतृत्व करणारे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांनाही तेव्हाच्या पदाधिकारी व काही संचालकांनी न जुमानता मनमानी कारभार केला. याचा राजकीय फटका दोनवेळा पी. एन. पाटील यांना बसला. जर पाटील यांनी लक्ष घातले असते तर कारखान्याची सत्ता त्यांच्या ताब्यात राहिली असती, हे त्रिवार सत्य आहे.
पी. एन. पाटील यांच्या २0 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी राष्ट्रवादी, शेकाप, जनता दल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना या सर्वांनी युती करून सत्ता हस्तगत केली. सभासदांना हे संचालक काही तरी करून दाखवतील, अशी अपेक्षा होती. त्यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतलेही, पण जुनी मिल विक्री, मोलॅसिस विक्री, बारदान खरेदी, साखर विक्री, माल खरेदी यामध्ये पदाधिकाऱ्यांसह संचालकांनी सहा वर्षांत कारखान्याचा केलेला तोटा हा सध्या विरोधकांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे. नोकरभरतीत कधी नव्हे तो झालेला पैशांचा व्यवहार, यामध्ये अनेकांनी हात धुऊन घेतले या सध्या चव्हाट्यावर आलेल्या गोष्टी आहेत.
अशी असेल संभाव्य लढत
एकंदरीत सध्याचे चित्र पाहता जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील, ज्येष्ठ नेते कृष्णराव किरुळकर, दूध संघाचे संचालक अरुण डोंगळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पॅनेल हे विरोधात असेल. तसेच सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शेकापचे नेते माजी आ. संपतराव पावर-पाटील, शिवसेना आ. चंद्रदीप नरके, काँग्रेसमधील काही नाराज, जनता दल यांचे संयुक्त पॅनेल अशी रचना होण्याची शक्यता आहे, तर या दोन्ही पॅनेलला पर्याय म्हणून काँग्रेसचेच एक वजनदार नेते व कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले हे दोन्ही पक्षांतील नाराज व ज्यांना उमेदवारी मिळालेली नाही, अशांना घेऊन एक प्रबळ पॅनेल उभे करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना प्रत्येक गावात मिळत असलेला प्रतिसाद पाहता ते दोन्ही काँग्रेसच्या पॅनेलला डोकेदुखी ठरणार यात शंका नाही. राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपनेही या निवडणुकीत शड्डू ठोकला आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत मित्र पक्षांना घेऊन त्यांनी पाच हजारांवर मते घेतली होती. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.