कोल्हापुरातील शेंडा पार्कात ८५ एकर जागेत माता-बालसंगोपन रुग्णालय; केंद्र शासनाकडून ३४ कोटींचा निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 12:13 PM2023-04-08T12:13:55+5:302023-04-08T12:14:14+5:30
या रुग्णालयासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता
कोल्हापूर : ‘केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने कोल्हापुरात एक अद्ययावत व प्रशस्त असे माता व बालसंगोपन रुग्णालय उभारले जाणार असून त्यासाठी ३४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शंभर बेडचे हे रुग्णालय होणार आहे. या रुग्णालयामुळे जिल्ह्यातील माता- बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल’, अशा विश्वास खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
येथील शेंडापार्कातील मेडिकल कॉलेजच्या आवारातील ८५ एकरातील प्रशस्त जागेमध्ये या रुग्णालयाचे भूमिपूजनही शुक्रवारी झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
खासदार मंडलिक म्हणाले, या रुग्णालयासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. त्याच्या मंजुरीसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया, आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या रुग्णालयामुळे कोल्हापूरच्या आरोग्य सुविधांमध्ये भर पडणार असून माता व बालकांना उत्कृष्ट व जलद आरोग्य सुविधा मिळू शकतील. या रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे. कोरोनाच्या काळात मतदारसंघातील जनतेच्या आरोग्यासाठी खासदार निधी व मंडलिक फाउंडेशनमार्फत दोन कोटींहून अधिक निधी दिला आहे’, असे खासदार मंडलिक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी स्वागत केले. राहुल सूर्यवंशी यांनी आभार मानले. यावेळी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीष कांबळे, आरोग्य उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.