माता-बालमृत्यूचे प्रमाण कमी होणार
By admin | Published: September 18, 2014 12:23 AM2014-09-18T00:23:27+5:302014-09-18T00:23:43+5:30
चिरायू योजनेचा प्रारंभ : जिल्हा परिषद आरोग्य विभागाची मोहीम
कोल्हापूर : आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून माता मृत्यू व नवजात अर्भक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ‘चिरायू’ ही अभिनव योजना आणली आहे. त्याचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर यांच्या प्रयत्नांतून ‘कायापालट’ योजनेपाठोपाठ ही योजना सुरू केली.
या योजनेंतर्गत आशा स्वयंसेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व असंरक्षित जोडप्यांच्या मासिक पाळीचे सनियंत्रण करणार आहे. ज्या असंरक्षित स्त्रीची मासिक पाळी सलग तीन महिने आलेली नाही, तिची निश्चय कीटद्वारे तपासणी करेल. ती स्त्री गरोदर असल्यास त्याबाबतची माहिती आरोग्य सेविकेला देईल. आरोग्य सेविका त्या स्त्रीची नोंद गरोदर माता म्हणून पुस्तिकेत करेल. अशा प्रकारे बारा आठवड्याच्या आत नोंदणी केलेल्या सर्व गरोदर मातांची किमान चारवेळा वैद्यकीय तपासणी, शंभर दिवस लोहयुक्त गोळ्या, धनुर्वात प्रतिबंधक लस दिली जाईल. त्याचबरोबर आहार विषयक सल्ले दिले जातील. सुरक्षित प्रसुतीसाठी नातेवाइकांच्या मदतीने प्रसुतीचे ठिकाण निश्चित करेल. या सर्व सेवांचे संनियत्रण करण्यासाठी विहित नमुन्यात नोंद वही व अहवाल तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक बाळंतपण हे शासकीय आरोग्य संस्थेत करण्यावर या योजनेत भर आहे.
प्रसुतीनंतर ४२ दिवस आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका यांच्यामार्फत भेटी देऊन स्तनपान, बाळ उबदार ठेवणे, नाळ स्वच्छ ठेवणे, हात स्वच्छ धुणे व बाळाला दवाखान्यात केव्हा घेऊन जावे याबाबत समुपदेशन करण्यात येणार आहे. ‘चिरायू’ योजनेत आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, तालुका गटसमूह, संघटक व आशा गटप्रवर्तक यांची महत्त्वाची भूमिका आहे. दरम्यान, कायापालट योजनेत चांगले काम करणाऱ्या बांबवडे, भेडसगाव, कळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर आदी उपस्थित होते.
चांगल्या कामासाठी बक्षीस
या योजनमध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका, आशा गटप्रवर्तक, तालुका गटसमूहक यांच्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली आहे. बक्षीस योजनेंतर्गत दरमहा रोख बक्षीस देण्यात येईल.