माथाडी कामगारांच्या आंदोलनाने वस्त्रनगरी अस्वस्थ

By admin | Published: September 20, 2015 10:26 PM2015-09-20T22:26:49+5:302015-09-21T00:05:04+5:30

काम बंद आंदोलनाचा फटका : उद्योजक, कारखानदार, व्यापारी, व्यावसायिक पुन्हा अडचणीत

Mathanari Workers' agitation agitation was unhealthy | माथाडी कामगारांच्या आंदोलनाने वस्त्रनगरी अस्वस्थ

माथाडी कामगारांच्या आंदोलनाने वस्त्रनगरी अस्वस्थ

Next

इचलकरंजी : माथाडी कामगारांच्या काम बंद आंदोलनामुळे वस्त्रनगरी अस्वस्थ झाली आहे. मालगाडीतून सूत बाचक्यांची उतरणी आणि मालगाडीत कापडाच्या गाठींची भरणी बंद झाल्याने उद्योजक, कारखानदार, व्यापारी व व्यावसायिक पुन्हा अडचणीत आले आहेत.यंत्रमाग कामगारांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी त्वरित करावी, या मागणीसाठी लालबावटा सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने २१ जुलैपासून पुकारलेला संप चांगलाच लांबला. ५२ दिवस चाललेल्या या संपामुळे वस्त्रनगरीतील यंत्रमागाची चाके थंडावली. कापड निर्मितीमध्ये घट झाल्यामुळे दररोज सुमारे शंभर कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. परिणामी आर्थिक टंचाई जाणवू लागली. शहरातील सर्वच व्यवसायांवर त्याचा परिणाम झाला. सायझिंग कामगारांचा संप संपुष्टात येऊन आठवडाही उलटला नाही आणि माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू झाले. शहरामध्ये परराज्यांतून सुमारे २५ ट्रक सुताची आवक होते. या ट्रकमधील सूत उतरविण्यासाठी हमालीमध्ये वाढ व्हावी, त्याचप्रमाणे सुमारे २५ ते ३० मालगाड्या कापडाच्या गाठी अहमदाबाद, राजस्थान, उत्तर प्रदेश, आदी राज्यांमध्ये पाठविल्या जातात, त्या मालगाड्यांमध्ये कापडाच्या गाठी भरण्यासाठीसुद्धा मजुरीत वाढ करावी, अशी मागणी हमाल कामगारांच्या कृती समितीने केली. याबाबत सहा बैठका झाल्या. मात्र, तोडगा निघाला नाही.सूतगिरण्यांकडून येणारे सूत मालगाडीमधून संबंधित कारखानदार किंवा व्यापारी यांना त्यांच्या सुताच्या नोंदणीनुसार पाच-सहा ठिकाणी उतरविले जाते. त्यासाठी हमालीही अधिक मिळत असते. तरीसुद्धा ट्रकमधील सूत एकाच जागी उतरावे आणि तेथून छोट्या टेम्पोमधून संबंधित कारखानदार किंवा व्यापाऱ्यांनी न्यावे, यासाठी हमाल संघटनेने डोअर डिलिव्हरी बंद केली. शहरामधील आॅटोलूम कारखानदारांना साधारणत: प्रत्येक महिन्यास एक हजार बाचकी सूत लागते. या नवीन बदलामुळे कारखानदारांना गोदामातून सूत उचलण्यासाठी महिन्याला साधारणत: ३० ते ३५ हजार अधिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे अन्य शहरांत सुरू असलेली डोअर डिलिव्हरी पूर्वीप्रमाणेच इचलकरंजीतसुद्धा सुरू राहावी, अशी कारखानदार व व्यापाऱ्यांची मागणी आहे. मात्र, ही मागणी हमाल संघटनांकडून धुडकावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

आमदारांची शिष्टाई फेटाळली
वाहतूकदार संस्था व हमाल संघटना यांच्यामध्ये निर्माण झालेल्या वादाबाबत आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडे संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये हाळवणकर यांनी मध्यस्थी करून सहा चाकी ट्रकमधून सूत उतरविण्यासाठी टनाला शंभर रुपये वाढ, तर सुताचे बाचके मालगाडीतून गोदामात उतरविण्यासाठी ८० पैशांची वाढ सूचविली आणि हमालांचे काम बंद आंदोलन मागे घेण्यास सांगितले. मात्र, हमाल संघटनांनी हा प्रस्ताव फेटाळला.

वाहतूकदारांची आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
रविवारी शहरातील वाहतूकदार संस्थांची एक बैठक झाली. कामगार संघटनेबरोबर चर्चा न करता हा प्रश्न आता जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्याकडे घेऊन जाण्याचे या बैठकीत ठरले. कामगार नेत्यांची भूमिका अवाजवी व अडेलपणाची असल्याने, सहायक कामगार आयुक्त सांगतील तसे सरकारी नियमाप्रमाणे हमाली वाढ देण्याचेही यावेळी निश्चित करण्यात आले.

Web Title: Mathanari Workers' agitation agitation was unhealthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.