गणित, अर्थशास्त्राला लागला कस, सुमारे १६ हजार जणांनी दिली संयुक्त परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 06:50 PM2019-03-24T18:50:22+5:302019-03-24T18:53:19+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) रविवारी कोल्हापूर शहरातील ५६ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्तपरीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर केंद्रावरून १६ हजार २४९ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १ हजार ७७७ जण गैरहजर राहिले. ‘गणित, अर्थशास्त्र विषयांवरील प्रश्न सोडविताना कस लागला,’ ‘वेळ कमी पडला’, अशा प्रतिक्रिया काही परीक्षार्थींनी व्यक्त केल्या.
कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) रविवारी कोल्हापूर शहरातील ५६ उपकेंद्रांवर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्तपरीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर केंद्रावरून १६ हजार २४९ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १ हजार ७७७ जण गैरहजर राहिले. ‘गणित, अर्थशास्त्र विषयांवरील प्रश्न सोडविताना कस लागला,’ ‘वेळ कमी पडला’, अशा प्रतिक्रिया काही परीक्षार्थींनी व्यक्त केल्या.
या परीक्षेसाठी कोल्हापूर केंद्रावरून १८ हजार २६ उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा उपकेंद्रांवर पोलीस कर्मचाऱ्यांनी उमेदवारांना तपासून आत सोडले. शहरातील विविध ५६ उपकेंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत परीक्षा झाली.
१०० गुणांसाठी सामान्यज्ञान, चालू घडामोडी, गणित, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, आदी विषयांवरील १०० प्रश्न विचारण्यात आले होते. वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी असे प्रश्नांचे स्वरूप होते.
परीक्षेचे केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालये उमेदवार आणि त्यांच्यासमवेत आलेल्या पालकांच्या गर्दीने फुलली. परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी आयोगाकडून विशेष निरीक्षक, भरारी पथक कार्यरत होते. जिल्ह्यातील महसूल विभागाचे २३०० अधिकारी, कर्मचारी या परीक्षेसाठी कार्यरत होते.
कोल्हापूरशी संबंधित प्रश्न
या परीक्षेत कोल्हापूरशी संबंधित दोन प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले?, सन १९११ मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोणाला त्याचे अध्यक्ष नियुक्त केले; या प्रश्नांचा समावेश होता.
गणित, बुद्धिमत्ता, अर्थशास्त्र विषयांवरील प्रश्नांची काठिण्यपातळी अधिक होती. उर्वरित पेपर चांगला होता.
- अजित पाटील,
बोलोली (ता. करवीर)
बुद्धिमत्ता, गणित विषयावरील प्रश्न सोडविताना कस लागला. हे प्रश्न सोडविताना वेळ कमी पडला.
- स्नेहल पाटील, चंदगड