मटका भोवला; कुरुंदवाडचे उपनगराध्यक्ष पाटील हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 01:05 AM2017-08-03T01:05:01+5:302017-08-03T01:05:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : येथील नगरपरिषदेतील राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष जवाहर ऊर्फ बाबासाहेब जिनगोंडा पाटील यांना इचलकरंजी विभागीय दंडाधिकारी समीर शिंगटे यांनी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. पालिका पदाधिकाºयावरील हद्दपारीची कारवाई ही कुरुंदवाडच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. या कारवाईने राजकीय खळबळ उडाली. दरम्यान, कुरुंदवाड पोलिसांनी उपनगराध्यक्ष पाटील यांना कर्नाटक राज्यातील कागवाड (ता. अथणी) येथे सोडले.
कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी २०१६ मध्ये मटका बुकी मालक जवाहर पाटील यांच्याबाबत मुंबई पोलीस कायदा १९५१ च्या कलमानुसार ५६ (अ) (ब) नुसार हद्दपार करण्याचा प्रस्ताव इचलकरंजी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.
या प्रस्तावाचा जयसिंगपूरचे पोलीस उपअधीक्षक यांनी तपास करून प्रांताधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला होता. या प्रस्तावानुसार सदर व्यक्ती राहते ठिकाणी अपराध करू शकत असल्याने त्यास हद्दपाल करण्यात यावे, असा मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कमल ५६ ची तरतूद आहे. त्यामुळे या कलमानुसार जवाहर पाटील यांना दोन वर्षांसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचा आदेश प्रांताधिकारी शिंगटे यांनी आज दिला.
राजकीय उलथापालथी शक्य
जवाहर पाटील हे मटका बुकी चालवित असल्याने त्यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. यापूर्वीही त्यांच्यावर हद्दपारीचा प्रस्ताव सादर झाला होता, मात्र त्यातून अभय मिळविण्यात ते यशस्वी झाले होते. पाटील राष्ट्रवादीचे असून, नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदावर आहेत. त्यांचा राजकीय कार्यकालही वादग्रस्त आहे. नगरपालिकेच्या एखाद्या पदाधिकाºयावर हद्दपारीची नामुष्की येणे ही कुरुंदवाडच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. यामुळे पालिकेतील राजकीय उलथापालथींना गती मिळण्याची शक्यता आहे.