साहित्याचे मंथन होत राहणे गरजेचे
By Admin | Published: January 4, 2015 09:23 PM2015-01-04T21:23:10+5:302015-01-05T00:39:53+5:30
ग्रंथमहोत्सव : साहित्य संमेलन काल, आज आणि उद्या परिसंवादातील सूर
सातारा (बाबा आमटे नगरी) : मराठी भाषेच्या जतनासाठी साहित्य संमेलने गरजेचे असून, यानिमित्ताने साहित्याचं मंथन होऊन भाषा समृद्धीसाठी पोषक वातावरण तयार होतं. त्यामुळे संमेलनेही गरजेचीच आहेत, असा सूर ग्रंथमहोत्सवातील ‘साहित्य संमेलन : काल, आज आणि उद्या’ या परिसंवादात व्यक्त झाला.
ग्रंथमहोत्सवात शनिवार दुपारच्या सत्रात हा परिसंवाद झाला. माजी खासदार व साहित्यिक यशवंतराव गडाख-पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, पुण्याचे माजी महापौर दिलीप बराटे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस यांनी या परिसंवादात सहभाग घेतला होता. साहित्य संमेलनांच्या बाबतीत अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात. या पार्श्वभूमीवर या परिसंवादातील चर्चेला महत्त्व आले होते. या अनुषंगाने अत्यंत पोषक अशी चर्चाही यावेळी झाली. ‘मराठी आपली आई आहे आणि दिवाळीप्रमाणे तिचा उत्सव आपण साजरा करायला पाहिजे. साहित्य संमेलनांच्या माध्यमातून हे घडत असते. दर वीस वर्षांनी पिढी बदलत असते. त्यामुळे या पिढीला पोषक असे वातावरण निर्माण करण्याची आणि त्यांच्यापर्यंत सकस साहित्य पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक साहित्यिकावर असते. सातारच्या ग्रंथमहोत्सवाने गेल्या १६ वर्षांपासून लीलया ही जबाबदारी पेलली आहे. मराठीच्या जागरासाठी जे आवश्यक आहे, ते करण्याची तयारी ठेवावी. यामध्ये संयोजकांची भूमिका महत्त्वाची ठरते. कितीही टीका झाली, अथवा आरोप झाले तरी आयोजकांनी कणखरपणे तिला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.’ यावेळी त्यांनी औरंगाबाद येथे गुलजार यांच्याशी झालेल्या चर्चेचे सार सांगितले. ‘बारीश को रोक नहीं सकते पर अनाज को सांभालके रखिए!’ या सूचक शब्दांत गुलजार यांनी आरोप कसे झेलावेत, याचे स्पष्टीकरण केले. भारत देसडला म्हणाले, ‘पंजाबमधील घुमान येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन केल्यानंतर याठिकाणी मराठी साहित्यप्रेमी येणार का, असा सवाल उपस्थित केला गेला. मात्र, जगभरातील मराठी लोकांनी या संमेलनाला प्रतिसाद दिला आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत नामदेव महाराजांनी पंजाबी लोकांशी मराठीचा धागा जोडला आहे. पंजाबी लोकांना मराठीचा नेहमीच आदर राहिला आहे.’
रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे, अशोक नायगावकर, दिलीप बराटे, प्रकाश पायगुडे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, शिरीष चिटणीस यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
परिसंवादात वाजले शाब्दिक फटाके
‘आमची मुले इंग्रजी शाळेत शिकतात. त्यांच्यापर्यंत मराठीचा जागर होणे आवश्यक आहे. याबाबत लोक मागणी करत असतात,’ असे शिरीष चिटणीस यांनी सांगितले. त्यांच्या मागणीवर कोटी करताना रामदास फुटाणे यांनी ‘साहित्यिक आपली मुले इंग्रजी शाळेत का घालतात?, त्यांनीच जर आपल्या मुलांना मराठी शाळेत घातले तर हा प्रश्न उपस्थित होणार नाही,’ असे म्हणत शाब्दिक फटाके फोडले.