निवडणूक काळात जप्त केलेला मुद्देमाल २४ तासांत परत, तक्रार निवारण समितीमुळे व्यावसायिकांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 04:48 PM2024-10-22T16:48:52+5:302024-10-22T16:49:24+5:30
कोल्हापूर : निवडणूक काळात सोने, चांदी, रोख पैसे एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे ते हमखास जप्त होणार हे ...
कोल्हापूर : निवडणूक काळात सोने, चांदी, रोख पैसे एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे ते हमखास जप्त होणार हे आतापर्यंत ठरलेले असायचे. हा जप्त मुद्देमाल प्रशासनाच्या ताब्यातून सोडवण्यासाठी संबंधिताच्या अक्षरश: चपला झिजतात. मात्र, हाच मुद्देमाल आता २४ तासाच्या आत संबंधितांना मिळू लागला आहे. जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण समितीमुळे यात पारदर्शकता आली असून या काळात मौल्यवान वस्तूंचा व्यवसाय करणाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
निवडणूक काळात मतदारांना मोठ्या प्रमाणात पैशाचे आमिष दाखवले जाते. त्यासाठी निवडणूक आयोग आचारसंहिता लागू झाल्यावर जागोजागी तपासणी नाके उभे करून वाहनांची तपासणी करते. यात सोने, चांदी, रोख पैसे व मौल्यवान धातू आढळल्यास थेट ते जप्त केले जातात. हे पैसे किंवा दागिने निवडणुकीसाठी नाही तर व्यावसायिक वापरासाठी नेले जात असल्याचा पुरावा दिल्याशिवाय परत मिळत नाहीत. यासाठी संबंधित व्यावसायिकाला ते परत मिळवण्यासाठी हजारदा हेलपाटे मारावे लागत.
निवडणूक आयोगाने अशा प्रकारे पकडलेले दागिने, पैसे व्यापाऱ्याचे आहेत की राजकीय वापरासाठी वापरले जाणार आहेत. याची शहानिशा करण्यासाठी जिल्हानिहाय तक्रार निवारण समिती नेमली आहे. या समितीसमोर जप्त केलेला माल निवडणुकीसाठी वापरणार नसल्याचे सिद्ध केल्यास २४ तासाच्या आत तो परत मिळतो.
हुपरीतील व्यावसायिकांचा पुढाकार
हुपरीतील चांदी व्यवसाय देशभर प्रसिद्ध आहे. येथील चांदीचे विविध प्रकारचे दागिने देशातील अनेक शहरांमध्ये पाठवले जातात. मात्र, निवडणूक काळात हे दागिने चेकपोस्टवर वारंवार पकडले जात असल्याने या काळात येथील व्यावसाायिकांना मोठा फटका बसत होता. याविरोधात आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने तक्रार निवारण समिती सक्र य केली.
निवडणूक काळात जर मौल्यवान वस्तू किंवा रोख पैसे जप्त केले तर तक्रार निवारण समितीकडे जाऊन या वस्तूंचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही याचे पुरावे द्यावे लागतात. त्याची पडताळणी करून यात तथ्य आढळले तर आपला माल आपणास २४ तासांत परत मिळतो. -मोहन खोत, अध्यक्ष, हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन.