राजकीय दबावातून मॅटचे बिल अदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:24 AM2020-12-31T04:24:28+5:302020-12-31T04:24:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील शाळेला पुरविण्यात आलेल्या मॅटबाबत वर्कऑर्डर देताना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील शाळेला पुरविण्यात आलेल्या मॅटबाबत वर्कऑर्डर देताना आणि बिल काढताना राजकीय दबाव होता, असे स्पष्ट झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनीच अध्यक्ष बजरंग पाटील यांना लेखी पत्राव्दारे ही माहिती दिली आहे. आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवारी स्थायी समितीच्या सभेत ही माहिती देण्यात आली.
गेल्यावर्षीपासून शिंगणापूर शाळेला पुरविण्यात आलेल्या मॅटबाबत तक्रारी होत्या. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात पुरवठाधारकाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेत सदस्य विजय बोरगे यांनी हा विषय ताणल्यावर पदाधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र, अशी समिती बेकायदेशीर असल्याचे सांगत मित्तल यांनी अधिकाऱ्यांची समिती नेमली. या समितीच्या अहवालावरून मित्तल यांनी एक पानी अहवाल अध्यक्षांना सोमवारी सादर केला आहे.
चौकट
अहवालातील मुद्दे
१) मॅटचे स्पेसिफिकेशन्स आणि टेंडर आणि ॲग्रिमेंटप्रमाणे पुरवठा करणे गरजेचे होते.
२) बिल काढताना तपासणी अहवाल घेणे आवश्यक होते. तो अहवाल घेतला नाही.
३) राजकीय दबाव आणून वर्कऑर्डर आणि बिल काढण्याचा प्रयत्न झाला आहे.
४) दबाव आला असेल तरी शिक्षण किंवा वित्त विभागाकडून कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली नाही.
५) यातून शासनाचे १६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
६) नुकसानभरपाई करण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मॅट बदलून दिली पाहिजे किंवा शिक्षण विभागाने अडीच लाख रुपये, वित्त विभागाने २ लाख रुपये आणि पुरवठादाराने ११ लाख ५ हजार रुपयांची भरपाई करावयाची आहे.
७) ज्यांना राजकीय दबाव आहे असे वाटते त्यांनी स्वतंत्रपणे पोलिसांकडे तक्रार करावी.
चौकट
...हा तर अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न
अमन मित्तल हे अधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय भोजे यांनी केला आहे. जर याबाबत चुका झाल्यात हे स्पष्ट आहे, तर मग संबंधितांवर कारवाई करण्याचा मुद्दा यामध्ये का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा नुसता अहवाल आहे. हा कारवाई अहवाल नाही, असे सांगत याबाबत आपण जाब विचारणार असल्याचे भोजे यांनी सांगितले. अरुण इंगवले यांनीही स्थायी समिती सभेत याबाबत विचारणा केली.
चौकट
नेमका कोणाचा दबाव
वर्कऑर्डर देण्यासाठी नेमका कोणाचा राजकीय दबाव होता, हे आता स्पष्ट करण्याची गरज आहे. लेखी पत्रामध्ये राजकीय दबावाचा उल्लेख आल्यामुळे हा दबाव कोणी टाकला आणि निकृष्ट दर्जाची मॅट पुरवली, याचा खुलासा होण्याची गरज आहे.