प्रीती व संदीप गर्जे यांना ‘माउली आनंदी’ पुरस्कार -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:21 AM2021-02-07T04:21:17+5:302021-02-07T04:21:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : श्री सद‌्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा माउली आनंदी पुरस्कार बीड येथील ...

Mauli Anandi Award to Preeti and Sandeep Garje - | प्रीती व संदीप गर्जे यांना ‘माउली आनंदी’ पुरस्कार -

प्रीती व संदीप गर्जे यांना ‘माउली आनंदी’ पुरस्कार -

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : श्री सद‌्गुरू दादा महाराज सांगवडेकर सेवा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा माउली आनंदी पुरस्कार बीड येथील प्रीती गर्जे व संदीप गर्जे या दाम्पत्याला जाहीर झाला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व ज्ञानेश्वरीची प्रत असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शुक्रवारी (दि. १२) पुरस्काराचे वितरण होणार आहे.

श्री सद‌्गुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर यांचा १०२ वा पुण्यस्मरण सोहळा ८ ते १४ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. त्याअंतर्गत दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. गर्जे दाम्पत्याने गेवराईपासून ३ किलोमीटर अंतरावर ‘सहारा अनाथालय परिवार’ या संस्थेची स्थापना केली आहे. येथे ३ ते १८ वयातील ८५ बालके बालग्राम या त्यांच्या हक्काच्या घरात भावनिक ओलाव्यात राहत आहेत. समाजातील अनाथ, निराधार, वंचित, उपेक्षित बालकांचे पुनर्वसन करणे व त्यांना हक्काचे बालपण देण्याचे कार्य संस्थेतर्फे केले जाते.

यंदाच्या सोहळ्यात ह.भ.प. विवेक घळसासी, विवेकबुवा गोखले, वैजनाथ महाजन यांची प्रवचने, शरदबुवा घाग, कलापिनी कोमकली यांचे गायन, वासुदेवराव जोशी यांचे काल्याचे कीर्तन व कोरोनाकाळात मोलाचे योगदान दिलेले वैद्य, डॉक्टर व साधक यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा साधेपणाने व मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. ‘विश्वपंढरी’च्या अधिकृत फेसबुक पेजवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल, साधकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

----------------------

फोटो मिळाल्यास स्वतंत्र पाठवू.

Web Title: Mauli Anandi Award to Preeti and Sandeep Garje -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.