Kolhapur: जन्मजात नाहीत हात, पोर्लेच्या माऊलीला इच्छाशक्तीची साथ; बृहन्मुंबई महापालिकेत सहायक कार्यकारी अधिकारीपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 17:25 IST2025-04-10T17:25:05+5:302025-04-10T17:25:56+5:30
नकोशी वाटणारी माऊली लाडकी बनली

Kolhapur: जन्मजात नाहीत हात, पोर्लेच्या माऊलीला इच्छाशक्तीची साथ; बृहन्मुंबई महापालिकेत सहायक कार्यकारी अधिकारीपदी निवड
सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : जन्मजात दोन्ही हात नसलेल्या तरुणीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. जिद्द, इच्छाशक्ती आणि अभ्यासातील सातत्याने माऊली बळवंत आडकूर हिने हे यश मिळविले. सरळसेवेतून भरती झालेल्या माऊलीला एमपीएसी परीक्षा देऊन वर्ग एक पद मिळवायचे आहे.
दोन्ही हात नसलेल्या माऊली स्वत:ची सर्व कामे अलगदपणे करते. तिने आपले जीवन सुंदर बनविले आहे. तिची स्वत:च्या पायावर उभे राहून जीवन जगण्याची लहानपणापासून महत्त्वाकांक्षा होती म्हणून तिने दहावीला ७५ टक्के गुण मिळाल्यानंतर २०११ सरकारी पॉलिटेक्निकला कम्प्युटर डिप्लोमा पूर्ण केला. खासगीत नोकरी करण्याची तिची मानसिकता नसल्याने शिक्षण प्रवाहात बदल करून पुढील पदवीचे शिक्षण वाणिज्य शाखेतून केले. सध्या ती मानसशास्त्रातून एम. ए. करत आहे.
सात वर्षापूर्वी श्यामल नावाची भेटलेली मैत्रिण आणि शिक्षक प्रकाश ठाणेकर यांच्या माध्यमातून जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनमध्ये स्पर्धा परीक्षेचा सराव करण्याची संधी मिळाली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कित्येक वेळा एक-दोन मार्कात संधी हुकत होती. पण, तिने जिद्द सोडली नाही. डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या सरळसेवेच्या परीक्षेत यश मिळाले. बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक कार्यकारी अधिकारी होण्याची तिला संधी मिळाली. माऊलीच्या संघर्षाची कहाणी केवळ जिद्द आणि यशाची कहाणी नाही, तर ती शारीरिक मर्यादांवर मात करून यश मिळवण्याचा प्रेरणादायी जीवन प्रवास आहे.
नकोशी वाटणारी माऊली लाडकी बनली
जन्मजात हात नसलेल्या माऊलीचा सांभाळ आजीने केला, तर आईचा पदर तोंडात धरून तिने प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. जे करायचे नाही ते ती जिद्दीने करून दाखवायची. तिच्या या कृतिशील वागण्याने जन्मत:च नकोशी वाटणारी माऊली सर्वांची लाडकी बनली. दोन्ही पायांच्या बोटांनी सुईचा दोरा ओवण्यापासून ते कम्प्यूटर चालवणे, सुरपेटी वाजवण्याची कलाही तिने जिद्दीने अवगत केली आहे. दिव्यांगत्त्वावर मात करून तिने जगणे सुंदर बनविले आहे.
मुलींना शिकण्याची संधी दिली पाहिजे. मुलींनी जिद्दीने पुढे गाले पाहिजे. मी दिव्यांग असूनही माझ्यावर विश्वास दाखवून घरातल्यांनी मला लांब शिकायला पाठवले. त्यांचे पाठबळ होते म्हणून मी यश मिळविले. माझ्या संघर्षाची लढाई अजून संपलेली नाही, तिला स्वल्पविराम मिळाला आहे. एमपीएससीत यश मिळाल्यानंतर माझ्या संघर्षाला पूर्णविराम मिळेल. - माऊली आडकूर, पोर्ले तर्फ ठाणे