माउली जमदाडे ‘भोगावती साखर केसरी’
By admin | Published: December 25, 2015 01:00 AM2015-12-25T01:00:03+5:302015-12-25T01:04:38+5:30
मानाची भोगावती साखर केसरीची लढत जमदाडे आणि दोरवड यांच्यात २२ मिनिटे चालली
भोगावती : भोगावती साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब पाटील कौलवकर यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात गंगावेश तालमीचा माउली जमदाडे भोगावती साखर केसरीचा मानकरी ठरला. त्याने न्यू शाहूपुरीच्या संतोष दोरवडला चितपट केले, तर भोगावती कामगार केसरीचा संदीप वाळकुंजे, तर भोगावती ऊस वाहतूक केसरीचा सचिन जामदार मानकरी ठरला.
मानाची भोगावती साखर केसरीची लढत जमदाडे आणि दोरवड यांच्यात २२ मिनिटे चालली. यात सुरुवातीला जमदाडेने पायाला चाट मारत दुहेरी कब्जा काढत घिस्सा डावावर आघाडी घेतली. मध्यंतरी वेळेत दोरवडने पुड्डीत घिस्सा, मोर्चा काढून, दुहेरी पट, किल्ली तोड या डावाचा वापर करत जमदाडेवर कब्जा मिळवला. मात्र त्याने ताकदीने प्रतिकार करत एकेरी पट काढून झोळी बांधण्याचा प्रयत्न केला आणि पाठीमागच्या झोळी डावावर दोरवडचा पराभव केला.
भोगावती कामगार केसरी या किताबासाठी मोतीबाग तालमीचा विजय धुमाळ आणि इचलकरंजीच्या प्रकाश आवाडे अकॅडमीचा संदीप वाळकुजे यांच्यात लढत झाली. ३९ मिनिटे चाललेली ही लढत गुणावर सोडवण्यात आली. यात संदीप वाळकुजे विजयी ठरला. या लढतीत सुरुवातीपासून धुमाळ याने घुडणा डाव, एकेरी पट आकडी काढत, पट काढण्याचा प्रयत्न करत वरचढ ठरला होता, मात्र वाळकुजे याने चमकदार कामगिरी करीत गुणावर २९ मिनिटाला मात केली.
ऊस वाहतूक केसरीच्या लढतीत गंगावेश तालमीच्या सचिन जामदार याने मोतीबाग तालमीच्या श्रीपती कर्णवट याच्यावर मात केली. ३९व्या मिनिटाला आकडी डावावर त्याने विजय मिळवला. या लढतीत दोघेही मल्ल ताकदीने समान असल्यामुळे शेवटपर्यंत कोण विजयी होईल, हे सांगता येत नव्हते.
यावेळी कृष्णा साखर कारखान्याचे संचालक अविनाश मोहिते यांच्याहस्ते लढती लावण्यात आल्या. प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आखाडा पूजन वसंतराव पाटील यांच्याहस्ते, तर प्रतिमा पूजन कृष्णराव किरुळकर यांच्याहस्ते करण्यात आले. धैर्यशील पाटील यांनी स्वागत केले. यावेळी पंच म्हणून संभाजी वरुटे, कृष्णात कळंत्रे, रामा माने यांनी काम पाहिले. निवेदन बापूसोा राडे आणि कृष्णात चौगले यांनी केले. (वार्ताहर)
भोगावती येथे दादासाहेब पाटील पुण्यतिथी निमित्त झालेल्या मैदानात भोगावती साखर केसरी कुस्ती लावताना अविनाश मोहिते, धैर्यशील पाटील, केरबा पाटील, अशोकराव पाटील व इतर मान्यवर.