मोर्चासाठी मावळे, रणरागिणी सज्ज

By admin | Published: October 13, 2016 01:18 AM2016-10-13T01:18:52+5:302016-10-13T02:11:15+5:30

मराठा क्रांती मोर्चा : उद्या रंगीत तालीम; गल्ली, पेठांमध्ये तालमी, मंडळांच्या बैठकांना जोर

Maval, Ranaragini ready for the rally | मोर्चासाठी मावळे, रणरागिणी सज्ज

मोर्चासाठी मावळे, रणरागिणी सज्ज

Next

कोल्हापूर : शनिवारी होणाऱ्या सकल मराठा मोर्चासाठी कोल्हापुरातील दहा हजार मावळे व रणरागिणी सज्ज झाले आहेत. या मोर्चाचे नियोजन, पार्किंगची ठिकाणे, आपत्ती व्यवस्थापन या सगळ््याच्या तयारीसाठी उद्या, शुक्रवारी पोलिस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, मावळे व रणरागिणींची प्रत्यक्ष मोर्चाच्या मार्गावर रंगीत तालीम घेण्यात येणार आहे.
शनिवारी होणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शहरातील गल्ल्यांमध्ये, पेठांमध्ये, तालीम, मंडळांमध्ये मोर्चात सहभागी होण्यासाठीच्या बैठका सुरू आहेत. शासकीय आकडेवारीनुसार मोर्चात किमान ३० लाख नागरिक सहभागी होणार आहेत. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या या नागरिकांच्या सहभागाचे नियोजन करण्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या मदतीला कोल्हापुरातील तरुण मावळे आणि रणरागिणी सरसावल्या आहेत. त्यांच्यासाठी बुधवारी न्यू कॉलेज येथे मोर्चा व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मोर्चाला किंवा कोल्हापूरच्या नावलौकिकाला बाधा पोहोचेल, असे कोणतेही कृत्य करू नका. स्वयंशिस्त पाळा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी शहरासह बाह्य परिसरातील पार्किंगची ठिकाणे समजावून सांगितली. उद्या, शुक्रवारी सकाळी आठ वाजता महाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर मावळे आणि रणरागिणींनी जमायचे आहे.


शेंडा पार्कात वाहनतळाची सफाई
कोल्हापूर : शनिवारी होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी संपूर्ण कोल्हापूर शहरात जय्यत तयारी सुरू केली आहे. बाहेरगावांहून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी मुख्य वाहनतळ असणाऱ्या शेंडा पार्क मैदानाची बुधवारी पाहणी करून येथे साफसफाई करण्यात आली. दरम्यान, ‘मोर्चाला यायचं’ असे जनजागृतीचे फलक संपूर्ण शहरासह जिल्हाभर झळकू लागले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आदी मागण्यांसाठी शनिवारी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने निघणाऱ्या मराठा क्रांती विराट मोर्चाच्या जनजागृतीसाठी जिल्हाभर बैठका सुरू आहेत, तर विशेषत: युवा पिढीने या मोर्चाचे नेतृत्व हाती घेतल्याने त्याच्या नियोजनासाठी जय्यत तयारी केली आहे. या मोर्चामध्ये सुमारे ३० लाख नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा असल्याने हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार आहे. त्या पद्धतीने त्याचे नियोजन करण्यासाठी सारे कोल्हापूर सज्ज झाले आहे.
या मोर्चातील स्वयंसेवकांची भूमिका बजावणारे मावळे व रणरागिणी शनिवारच्या लढ्यासाठी सज्ज झाले आहेत. सुमारे दहा हजार मावळे व रणरागिणींनी मोर्चासाठी आपली आचारसंहिता ठरवून घेतली आहे. त्याबाबत नियोजनासाठी त्यांची बुधवारी तिसरी बैठकही झाली.
मोर्चाच्या जनजागृतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावा-गावांत, संपूर्ण शहरातील चौका-चौकांत ‘मोर्चाला यायचं’ असे भव्य फलक उभारले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर व जिल्हा डिजिटल फलकमय झाले आहे. प्रत्येक फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांची छायाचित्रे व मराठेशाहीचा इतिहास रेखाटला आहे. याबाबत नियोजनसाठी असणारी ‘वॉररूम’ कार्यकर्त्यांनी फुलून गेली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Maval, Ranaragini ready for the rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.