इचलकरंजीतील वर्चस्ववादातून मावसभावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:46 AM2019-09-25T11:46:15+5:302019-09-25T11:51:49+5:30

विशाळगड मार्गावरील मानोली (ता. शाहूवाडी) येथील संतोष मोहन तडाके (वय २८, रा. गुरुकनाननगर गल्ली, इचलकरंजी) याच्या निर्घृण खुनाचे रहस्य मंगळवारी उलगडले.

Mavsabha murder from domination in Ichalkaranji | इचलकरंजीतील वर्चस्ववादातून मावसभावाचा खून

इचलकरंजीतील वर्चस्ववादातून मावसभावाचा खून

Next
ठळक मुद्देइचलकरंजीतील वर्चस्ववादातून मावसभावाचा खूनविशाळगड मार्गावरील खुनाचे रहस्य उलगडले : चौघांना अटक

कोल्हापूर : विशाळगड मार्गावरील मानोली (ता. शाहूवाडी) येथील संतोष मोहन तडाके (वय २८, रा. गुरुकनाननगर गल्ली, इचलकरंजी) याच्या निर्घृण खुनाचे रहस्य मंगळवारी उलगडले.  इचलकरंजीतील वर्चस्ववादातून मावसभावानेच खून केल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात उघडकीस आले.

या प्रकरणी मावसभाऊ संजय शरद शेडगे (वय ३३), त्याचे साथीदार आमिर ऊर्फ कांच्या आब्बास मुल्ला (२२), सुनील बाळू खोत (४३), सिद्धराम ऊर्फ सिद्धू शांताराम म्हेत्रे (२५, सर्व रा. लिंबू चौक, इचलकरंजी) यांना अटक केली.

विशाळगडकडे जाणाऱ्या मार्गावर मानोली हद्दीत कोकण दर्शन पॉइंट येथे २० सप्टेंबरला २५ वयोगटातील अनोळखी तरुणाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करून आंबा घाटाच्या दरीत मृतदेह फेकून दिल्याचे उघडकीस आले होते. गळा चिरून निर्दयपणे खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना केल्या होत्या.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची तीन पथके त्यावर काम करीत होती. मृताची ओळख पटल्यानंतर पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक निरीक्षक संतोष पोवार, विकास जाधव, भालचंद्र देशमुख व त्यांच्या पथकाने आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी इचलकरंजी परिसरात मृत तडाकेचे नातेवाईक, शेजारी व मित्रपरिवाराकडे चौकशी केली.

यावेळी पोलीस हवालदार विजय कारंडे व जितेंद्र भोसले यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, संतोषचा खून त्याचा मावसभाऊ संजय शेडगे व आणखी तीन साथीदारांनी केला आहे. त्यानुसार संशयित आमिर मुल्ला याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता खुनाचे रहस्य उलगडले.

मुख्य सूत्रधार संजय शेडगे हा मृत संतोष तडाके याचा मावसभाऊ आहे. शेडगे राहत असलेल्या लिंबू चौक गल्लीत संतोष कुटुंबासह राहण्यास होता. तो नेहमी दारू पिऊन शेडगे व त्याच्या परिवारास, गल्लीतील लोकांना शिवीगाळ करून दहशत निर्माण करीत होता.

दारू पिण्यासाठी लोकांकडून पैसे काढून घेणे, शिवीगाळ करणे अशी कृत्ये करीत होता. त्याच्या दहशतीमुळे परिसरात त्याचे वर्चस्व वाढत होते. त्याचा राग शेडगेच्या मनात होता. त्याने स्वत:चे वर्चस्व वाढविण्यासाठी मावसभाऊ संतोषच्या खुनाचा बेत आखला.

अशी केली बतावणी

मुख्य सूत्रधार संजय शेडगे याने मावसभाऊ संतोषला ‘आपला मित्र कपिल याचा १९ सप्टेंबरला वाढदिवस आहे. तो विशाळगडला जाऊन साजरा करूया,’ म्हणून कारमध्ये बसविले. तेथून सर्वजण विशाळगड येथील कोकण दर्शन हॉटेलवर आले. रात्री अकराच्या सुमारास सर्वजण दारू प्यायले. त्यानंतर पिकनिक पॉइंट येथे लघुशंकेसाठी जाऊया म्हणून सर्वजण दरीच्या काठावर गेले.

या ठिकाणी बेसावध असलेल्या संतोषच्या डोक्यात पाठीमागून कोयत्याने वार करून त्याला खाली पाडले. चाकू व विळ्याने त्याचा गळा चिरून मृतदेह २०० फूट दरीत फेकून दिला. त्यानंतर चौघे संशयित मध्यरात्री दोनच्या सुमारास इचलकरंजीला आले. दुसऱ्या दिवशी पिकनिक पॉइंट परिसरात गुरे चारण्यास आलेल्या एका व्यक्तीला दरीपासून दहा फुटांवर मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरली.

केकच्या पाकिटावरून संशयितांचा माग

विशाळगड येथील घटनास्थळावर केकचे पाकीट पोलिसांना मिळाले. हॉटेलवर रात्री कोण आले होते; तसेच इचलकरंजी परिसरातील केकच्या दुकानात पोलिसांनी चौकशी केली असता संजय शेडगे याने केक खरेदी केल्याचे सांगण्यात आले. केकच्या पाकिटामुळे अवघ्या ७२ तासांत संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
 

 

Web Title: Mavsabha murder from domination in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.