कोल्हापूरचा पारा चढला; तगमग वाढली!; दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 03:59 PM2024-03-13T15:59:48+5:302024-03-13T16:01:33+5:30

आगामी आठ दिवस तापमानात आणखी वाढ होईल

Maximum temperature 38 degree in Kolhapur district on Tuesday | कोल्हापूरचा पारा चढला; तगमग वाढली!; दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील

कोल्हापूरचा पारा चढला; तगमग वाढली!; दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी तापमानाचा पारा एकदम वाढला होता. कमाल तापमान ३८ डिग्रीपर्यंत पोहोचल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. दुपारी १२ वाजेनंतर घराबाहेर पडणे मुश्कील झाले असून, आगामी आठ दिवस तापमानात आणखी वाढ होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. मंगळवारी किमान तापमान २२, तर कमाल ३८ डिग्रीपर्यंत होते. त्यामुळे उष्मा वाढला होता. सकाळी ८ वाजेपासूनच अंग तापत होते. त्यानंतर तापमानात वाढ होत गेली आणि दुपारी तर अंग भाजून निघत होते. कोल्हापूर शहरात त्याची तीव्रता अधिक जाणवत होती. डांबरी रस्त्यावरून जाताना डांबराच्या गरम वाफा अंगावर येत होत्या. या वाफांनी अधिकच घालमेल व्हायची. आगामी आठ दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सनक्लॉथ, टोप्यांचा वापर सुरू

उन्हापासून अंगाचे संरक्षण करण्यासाठी सनक्लॉथ, टोप्या व गॉगलचा वापर वाढू लागला आहे. दुचाकीवरून जाताना हात भाजून निघत असल्याने अंग पूर्ण झाकण्याचा प्रयत्न असतो.

विहीरी, तलाव फुल्ल

लाहीलाही करणाऱ्या उष्म्यापासून गारवा मिळण्यासाठी विहिरी, तलाव, नदीमध्ये पोहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

असे राहील तापमान (डिग्रीमध्ये)

वार - किमान - कमाल
बुधवार - २१ - ३८
गुरुवार - २० - ३८
शुक्रवार - २१ - ३९
शनिवार - १९ - ३९
रविवार - २२ - ४०

Web Title: Maximum temperature 38 degree in Kolhapur district on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.