२८ मे. टन मळीचा टँकर पकडला-दाजीपूर नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 06:18 PM2019-04-06T18:18:08+5:302019-04-06T18:18:27+5:30
गोव्याहून महाराष्ट्रात बेकायदेशीर मळीची वाहतूक करणारा टँकर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला आहे. २८ मे. टन मळीसह टँकर असा सुमारे १३ लाख
कोल्हापूर : गोव्याहून महाराष्ट्रात बेकायदेशीर मळीची वाहतूक करणारा टँकर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला आहे. २८ मे. टन मळीसह टँकर असा सुमारे १३ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी संशयित चालक ओमप्रकाश रामवध यादव (वय ४५, रा. हिंदुस्थान नगर, मुंबई) याला अटक केली आहे. त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तो दारू बनविण्यासाठी मळी सांगलीला घेऊन चालला होता. याप्रकरणी सखोल तपास सुरू असल्याची माहिती अधीक्षक गणेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्याच्या सीमारेषेवर दाजीपूर, राधानगरी, कानूर, चंदगड, आजरा, शिवनाकवाडी, कागल, गगनबावडा, आदी ठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत. कोल्हापुरात येणारे प्रत्येक वाहन तपासून सोडले जाते. ३१ मार्चला भरारी पथक राधानगरी तालुक्यात दाजीपूर चेकनाक्यावर तपासणी करीत असताना मळी घेऊन जाणारा टँकर मिळून आला. टॅँकरमध्ये मळी होती. हा द्रव पदार्थ सांगली जिल्ह्यात खत म्हणून शेतात टाकण्यासाठी आपण घेऊन जात आहे, असे चालक यादव याने पथकाला सांगितले; परंतु मळी कायदेशीरपणे महाराष्ट्रात आणण्याचा परवाना त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे मद्य तयार करण्यासाठीच अशा प्रकारची मळी नेत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
टॅँकरमधील हे रसायन तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले असता ती मळी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पुढील कारवाई करण्यात आल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. यावेळी उपअधीक्षक बापूसो चौगुले, वरिष्ठ निरीक्षक पांडुरंग पाटील, दुय्यम निरीक्षक अविनाश घाटगे, माधव चव्हाण, भीमराव बच्चे, प्रदीप गुरव, इंद्रजित कांबळे, ज्योती कंदले, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडलेला मळीचा टँकर व आरोपी. (छाया : दीपक जाधव)