हद्दवाढीसंदर्भात ३० मे रोजी तज्ज्ञ समिती कोल्हापुरात
By admin | Published: May 21, 2016 12:40 AM2016-05-21T00:40:28+5:302016-05-21T00:59:31+5:30
हद्दवाढ करण्यासंदर्भात दोन्ही बाजूंनी अभ्यास करण्याकरिता तज्ज्ञांची समिती नेमण्यात येत असल्याचे सांगितले होते.
कोल्हापूर : शहराच्या हद्दवाढीला असलेला विरोध आणि समर्थन अशा दोन्ही बाजूंचा अभ्यास करून शासनाला अहवाल देण्याची कामगिरी सोपविण्यात आलेली दोनसदस्यीय समिती ३० व ३१ मे रोजी कोल्हापुरात येणार आहे. ही समिती दोन्ही बाजूंच्या लोकांची मते जाणून घेणार आहे; तसेच भौगोलिक अभ्यासही करणार आहे. कोल्हापुरात सर्वपक्षीय हद्दवाढ समितीच्या शिष्टमंडळाशी बोलताना ५ मे रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हद्दवाढ करण्यासंदर्भात दोन्ही बाजूंनी अभ्यास करण्याकरिता तज्ज्ञांची समिती नेमण्यात येत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी नगरविकास विभागाने अतीश परशुराम व ज. ना. पाटील या दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. राज्यातील अनेक महानगरपालिकांनी हद्दीची वाढ करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ज. ना. पाटील यांनी सविस्तर अभ्यास करून शासनाला निर्णय घेण्याकरिता अहवाल दिले होते. त्यांचा या विषयाचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे या दोघांवर कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याकरिता परिपूर्ण अहवाल देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही समिती ३० आणि ३१ मे या दोन दिवसांत कोल्हापुरात येऊन हद्दवाढ समर्थक आणि विरोधक तसेच अन्य लोकांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेणार आहे. शिवाय महानगरपालिका प्रशासनाचा प्रस्ताव तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालानुसार भौगोलिकदृष्ट्या अभ्यास करणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला फोनवरून ही माहिती सांगितली.
महानगरपालिका प्रशासनाने शहरालगतची १८ गावे आणि दोन औद्योगिक वसाहतींचा हद्दवाढीत समावेश करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे; परंतु या मागणीला ग्रामीण भागातून विरोधही झाला आहे. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी या प्रश्नातून सकारात्मक मार्ग काढण्यासाठी समिती नेमली आहे. गेल्याच आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समिती नेमण्याची विनंती केली होती. पालकमंत्री पाटील हद्दवाढ करण्याबाबत सकारात्मक विचार करीत असले तरी असा निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)