आम्हाला शिक्षक द्याल का? : सात वर्ग, दोनशे विद्यार्थी अन् शिक्षक चार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:26 AM2019-12-04T00:26:44+5:302019-12-04T00:27:34+5:30
शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम होऊ लागला आहे. तसेच पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची पाटी अद्याप कोरीच आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून ही अवस्था असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट बिकट झाली आहे.
दशरथ आयरे ।
अणूस्कुरा : करंजफेण (ता.शाहूवाडी) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत दुसरे शैक्षणिक वर्ष संपत आले तरीसुद्धा पुरेसी शिक्षक संख्या नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
शाहूवाडी तालुक्यातील करंजफेण येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावूनच जाल. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असेलल्या शाळेत सुमारे २०० विद्यार्थी शिकतात. मात्र त्यांना शिकवण्यासाठी केवळ चारच शिक्षक आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे विषय शिक्षक उपलब्ध नाहीत म्हणून शाळेतील कला निदेशक शिक्षक पाचवी, सहावी व सातवी सेमी इंग्रजीचे वर्ग सांभाळत आहेत. सेमी इंग्रजी वर्ग सुरू असल्याने व सेमी इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना धड मराठीही येत नाही व धड इंग्रजीही येत नाही. यामुळे येथील शिक्षणाचे तीन तेरा वाजले आहेत.
या शाळेत किमान ७ शिक्षकांची आवश्यकता आहे. मात्र शाहूवाडी पंचायत समितीकडे वारंवार
पाठपुरावा करूनही काही उपयोग झालेला नाही. येथील शाळेत केंद्र मुख्याध्यापक एक पद, विषय शिक्षक चार पदे रिक्त आहेत. करंजफेण प्राथमिक शाळेत आजूबाजूच्या दहा ते बारा खेडेगावांतून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम होऊ लागला आहे. तसेच पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांची पाटी अद्याप कोरीच आहे. शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून ही अवस्था असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट बिकट झाली आहे.
बालकांना मोफत, सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याचा शासन एकीकडे उदो उदो करत असताना एकेकाळी गुणवत्तेसाठी ओळख असणारी करंजफेण केंद्र शाळा आज पंचायत समिती, जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्या उदासीन व राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे अक्षरश: गुणवत्तेत अप्रगत ठरली आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यामुळे परिसरातील संपूर्ण पिढीच वाया जाण्याची भीती पालकांना भेडसावत आहे.
शाळेत जायला रस्ताच नाही
केंद्र शाळेची इमारत डोंगरात उभारली आहे. शाळेपर्यंत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना करंजफेण येथील गुरव गल्ली ते केंद्र शाळा अशा पाचशे मीटर अंतरासाठी रस्त्याची कोणतीही सुविधा नाही. मुलांना डोंगर चढून पायी चालत जाताना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना मुले पाय घसरून पडतात व दुखापत होते. धडधाकट मुलांची ही अवस्था मग दिव्यांग मुले शाळेत कशी येत असतील, याची फक्त कल्पना केलेलीच बरी. शालेय प्रशासनाने याबाबत ग्रामपंचायतीकडे रस्त्याची मागणी केली आहे.
- परिसरातील विषय शिक्षक रिक्त असलेल्या शाळा
पेंडाखळे, सावर्डी, कांटे, अणूस्कुरा, बुरंबाळ, मांजरे, कुंभवडे, गावडी, गिरगाव, धनगरवाडा, गजापूर, शेंबवणे, गेळवडे, विशाळगड या शाळेमध्ये विषय शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे इंग्रजी व गणित विषयांचा अभ्यासक्रम शिकवणे अवघड झाले आहे.
लवकरच तालुक्यातील उपलब्ध शिक्षकांचा आढावा घेऊन मोठ्या शाळेत रिक्त असलेल्या जागेवर शिक्षकांचे तात्पुरते समायोजन करून शिक्षक देण्याची व्यवस्था करणार आहोत.
- पांडुरंग पाटील, उपसभापती, शाहूवाडी