नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना रोखले इचलकरंजीत तीव्र पाणीटंचाई

By admin | Published: June 5, 2014 01:10 AM2014-06-05T01:10:30+5:302014-06-05T01:30:17+5:30

विरोधात ठिय्या आंदोलन; पालिकेसमोर तणावाचे वातावरण

Mayor, Chief Officer, prevented from severe water shortage in Ichalkaranji | नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना रोखले इचलकरंजीत तीव्र पाणीटंचाई

नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांना रोखले इचलकरंजीत तीव्र पाणीटंचाई

Next

इचलकरंजी : आठवड्याभरापासून नळाला पाणी नसल्यामुळे पाणीटंचाईने हैराण झालेल्या नागरिकांनी, भाजपचे पदाधिकारी व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह नगरपालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. नळाला पाणी येणार नाही, तोपर्यंत पदाधिकार्‍यांना पालिकेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा पवित्रा घेत सुमारे तासभर झालेल्या आंदोलनामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी नियोजनबद्धरीत्या शहरात टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आणि ठिय्या आंदोलन संपुष्टात आले. शहरास पाण्याचा पुरवठा करणार्‍या कृष्णा नळयोजनेची दाबनलिका बदलण्याचे काम गेले पाच-सहा दिवस सुरू आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. दाबनलिका बदलण्याचे काम काल, मंगळवारी रात्री पूर्ण झाले होते. दाबनलिकेच्या जोडाची चाचणी घेण्यासाठी कृष्णा योजनेवरील ४५० अश्वशक्तीचा पंप सुरू झाला; पण अवघ्या पंधरा मिनिटांत जोडाच्या ठिकाणी मोठे छिद्र पडले आणि गळती सुरू झाली. नलिका फुटलेल्या ठिकाणी मोठा खड्डा पडून त्यातून जोरदारपणे बाहेर पडलेल्या पाण्याने शिरढोण (ता. शिरोळ) येथील शेतातील सोयाबीनचे पीक वाहून गेले, तर रस्त्यालगतच्या सुमारे पंधरा घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शहरास होणारा पाणीपुरवठा पुन्हा खंडित झाला. आठवडाभरापासून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत होता. आज, बुधवारी सकाळी भाजपचे शिष्टमंडळ शहर अध्यक्ष विलास रानडे, महिला आघाडीच्या अध्यक्षा वैशाली नायकवडे, धोंडिराम जावळे, अनिल डाळ्या, डॉ. अनघा कुलकर्णी, विनोद कांकाणी, सारिका भोकरे, बाबा नलगे, नगरसेविका आक्काताई कोटगी, संतोष शेळके यांच्यासह पालिकेच्या दारात आले, सोबत नागरिकही होते. त्यांनी पालिकेच्या प्रवेशद्वाराच्या पायरीवर पाऊण तास ठिय्या मारला. नगरपालिकेमध्ये कोणासही प्रवेश दिला नाही. नगराध्यक्षा बिस्मिल्ला मुजावर, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, जलअभियंता सुभाष देशपांडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे आंदोलनस्थळी आले. त्यांनी, कृष्णा जलवाहिनीवरील दाबनलिका बदलाचे सुरू असलेले काम व नलिका जोडल्यानंतर झालेल्या गळतीबाबतची स्थिती आंदोलकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला; पण आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर शहरात पाणीटंचाई आहे, तेथे प्राधान्याने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल. तसेच कृष्णा व पंचगंगा या दोन्ही योजनांमार्फत त्वरित पाणीपुरवठा सुरू करून पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे नगराध्यक्षा मुजावर व अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी सांगितले आणि आंदोलन संपुष्टात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Mayor, Chief Officer, prevented from severe water shortage in Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.